सुमित बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स कंपनीचा मालक आणि क्रिकेट बुकी अजय श्यामराव राऊत खंडणी प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचा (एनएसयूआय) माजी नागपूर जिल्हा अध्यक्ष भूषण मरसकोल्हे याला नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजय राऊतचे कॉसमॉस चौकातून अपहरण करणाऱ्यांसोबत तो होता, असा संशय पोलिसांना आहे.
गेल्या ११ डिसेंबरला अजय राऊत हा त्रिमूर्तीनगर चौकातील घरी जात असताना काही गुंडांनी कॉसमॉस चौकातून त्याचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याच्याकडून पावनेदोन कोटीची खंडणी वसूलल केली होती. या घटनेची तक्रार अजय राऊत याने पोलिसांना दिली. त्यानंतर अजय राऊत हा बेपत्ता झाला. त्याचा भ्रमणध्वनीही बंद होता. अजयचे गोवा येथे एक ‘कसिनो’ आहे. कदाचित पोलिसांना घाबरून तो गोव्याला निघून गेला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजय हा भीतीमुळे मुंबईत लपून बसला होता.
पोलिसांनी एक पथक मुंबईला पाठवले होते. त्यानंतर अजय राऊतशी संपर्क करून त्याला नागपूरला बोलावून घेतले.
आज सकाळी तो नागपुरात दाखल झाला. त्यानंतर दुपारी १२.३० च्या सुमारास गुन्हे शाखेत पोलिसांसमोर हजर झाला. तेव्हापासून रात्री उशिरा त्याला विविध प्रश्नांची उत्तरे मागण्यात आली. परंतु तो सहकार्य करीत नव्हता, अशी माहिती आहे.
एनएसयूआयचा माजी जिल्हा अध्यक्ष भूषण मरसकोल्हे याचे राजू भद्रेचा खास नंबरकारी शरद उर्फ कालू हाटे याच्याशी संबंध आहेत. अपहरणाच्या दिवशी भूषण हा गुंडांसोबत उपस्थित होता, असा संशय आहे. त्याच्या चौकशीसाठी पोलिसांनी भूषणला ताब्यात घेतले.
अपहरणाची कारवाई पूर्ण करणाऱ्या दिवाकर कुत्तरमारे आणि कालू हाटे यांचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले.

अजयकडून बनवाबनवीची उत्तरे
खंडणी देण्यासाठी राजू भद्रेने एक कोटी रुपयांची मदत अजय राऊतला केली. गुंडांच्या तावडीतून सुटल्यानंतर अजयने ताबडतोब भद्रेला १ कोटी रुपये परत केले. हे एक कोटी रुपये कोठून आणले, असा प्रश्न पोलिसांनी आज अजयला विचारला. त्यावेळी त्याच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. याशिवाय आपण एकाही गुंडाचा चेहरा बघितला नाही, असेही अजय वारंवार सांगतो. त्यामुळे अजय कुणाला तरी वाचवण्यासाठी बनवाबनवीचे उत्तर पोलिसांसमोर देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.