विकसित तंत्रज्ञानामुळे मागणी कमी झाली

एकेकाळी बाराही महिने बर्फाची मागणी असलेल्या नागपुरात आता बर्फाच्या व्यवसायाला उतरती कळा आली आहे. बर्फाचा उपयोग होत असलेल्या बहुतांश ठिकाणची जागा आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित यंत्रांनी घेतली आहे. त्यामुळे नागपूरच्या बर्फ व्यवसायात ८० टक्के घट झाली असून बर्फाचा व्यवसाय संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

नागपुरात बर्फ तयार करणारे १५ प्रमुख कारखाने आहेत. तीन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात याच कारखान्यातून दहा ते पंधरा ट्रक बर्फाच्या लाद्या जात होत्या. पूर्वी बर्फाचा प्रमुख उपयोग मासोळी व्यवसाय, मांस, दुधाचे पदार्थ, विदेशी फळ, भाज्या टवटवीत ठेवण्यासाठी, लग्न समारंभात पिण्याचे थंड पाणी मिळावे यासाठी मोठय़ा प्रमाणात होत होता.  तसेच औषध, आईस्क्रीमच्या वाहतुकीसाठीही व्हायचा. नंतर औषध आणि आईस्क्रीमच्या वाहतुकीसाठी आलेले अत्याधुनिक यंत्र तसेच कोल्ड स्टोरेजच्या मोठय़ा गोदामांमुळे बर्फाची मागणी अगदीच कमी झाली आहे.  तसेच लग्न समारंभात लागणाऱ्या बर्फाऐवजी आता २० लिटर पाण्याची कुल कॅन तसेच मिनरल वॉटरच्या छोटय़ा बाटल्या आल्याने बर्फाचा व्यवसाय अगदीच मर्यादित झाला आहे. पूर्वी दूध साठवणुकीसाठी शासकीय डेअरीमध्ये मोठय़ा प्रमाणार बर्फाची मागणी होती. केवळ बर्फासाठी विशेष निविदा निघत होत्या. मात्र आता नागपुरातील डेअरी देखील बंद झाल्याने त्याचाही परिणाम बर्फाच्या व्यवसायावर झाला आहे. रसायन उद्योग, औषध उद्योग अशी विविध उद्योगांमध्ये मालाचे तापमान राखण्यासाठी बर्फ वापरला जात होता. मात्र, त्यावरही आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने औद्योगिक वापरदेखील मर्यादित झाला आहे. केवळ उन्हाळ्यात उसाचा ताजा थंडगार रस, विविध प्रकारचे आईस गोले, हातगाडीवर विकणारी कुल्फी तसेच सरबत या व्यवसायापुरताच बर्फ उरला आहे.

व्यवसाय केवळ २० टक्क्यांवर

गेल्या दोन-तीन वर्षांपासून बर्फाचा जसा व्यवसाय नागपुरातून होत होता तो जवळपास संपुष्टात आला आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे बर्फाचा उपयोग कमी झाला असून आता व्यवसाय केवळ २० टक्क्यांवर आला आहे. विजेच्या वाढलेल्या दरांमुळे आता व्यवसायात काहीच राम उरला नाही. मासोळी वाहतूक आणि थोडय़ाफार इतर कामासाठी बर्फ विकला जात आहे.

– उमेश अग्रवाल, बालाजी आईस, गड्डीगोदाम