दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत असतानाच आता ग्रहकांना घरगुती सिलिंडरच्या दरवाढीचा मार सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरवरील मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने कमी करीत २७० वरून थेट ४० रुपयांपर्यंत खाली आणले आहे. त्यामुळे येत्या काळात अनुदानच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत.
इंधनाप्रमाणेच घरगुती सिलिंडरचेही दर वर-खाली होत असतात. त्यामुळे अनुदानाच्या रकमेतही फरक जाणवत असतो. दर महिन्याच्या एक तारखेला सिलेंडरचे नवे दर येत असतात. मात्र फेबुवारीत अर्थसंकल्प असल्याने केंद्र सरकारने सिलिंडरचे नवे दर चार फेब्रुवारीला जाहीर केले आणि त्यामध्ये थेट २५ रुपयांची वाढ केली. याच चालू महिन्यात सोमवारी पुन्हा ५० रुपयांची वाढ केली. त्यामुळे फेबुवारी माहिन्यात दोन वेळ एकूण ७५ रुपयांची दरवाढ झाली. तसेच सरकारने अर्थसंकल्पात गॅस सिलेंडरवरील अनुदानाचा कोटा कमी केल्याने ग्राहकांना मिळणारे अनुदानही कमी येऊ लागले आहे. सध्या एका विना अनुदानित सिलिंडरसाठी ८२१ रुपये मोजावे लागत असून त्यावर केवळ ४० रुपये अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळे अनुदानित सिलेंडर ७८१ रुपयांचे पडत आहे.
दरात वाढ, अनुदान तेवढेच
गेल्यावर्षी आक्टोबर महिन्यात सिलिंडरचे दर ६४६ होते त्यावर ४० रुपये अनुदानाच्या स्वरूपात मिळत होते. गेल्या सात महिन्यात टप्प्याटप्प्याने सिलिंडरची दरवाढ झाली असून सध्या सिलेंडरचे दर ८२१ झाले तरी अनुदान ४० रुपयेच मिळत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 12:14 am