शिक्षक दिन विशेष

देवेश गोंडाणे

इयत्ता आठवीपर्यंत साधी अक्षर-अंक ओळख नसलेल्या व सामाजिक, आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणारे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पं. बच्छराज व्यास शाळेतील आदर्श शिक्षक रोशन आगरकर. हे विद्यार्थी इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण करतील असा स्वप्नातही कुणी विचार केला नसताना शंभर टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण करण्याचा चमत्कार रोशन आगरकर यांनी घडवला आहे.

इयत्ता आठवीपर्यंत कुण्याही विद्यार्थ्यांला अनुत्तीर्ण करता येणार नाही या  सरकारच्या धोरणामुळे साधी अक्षर आणि अंक ओळखही नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्ग म्हणजे ‘आठ छ’. राजाबक्षा येथील पंडित बच्छराज व्यास विद्यालयातील रोशन आगरकर हे या ‘आठ छ’चेवर्गशिक्षक.  बरेच विद्यार्थी एक पालक असलेले व दोन विद्यार्थी पालक नसलेले होते. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना विशेष शाळेत शिक्षण द्यायला हवे अशी स्थिती होती. मात्र, ‘आठ छ’च्या ६२ विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्याचा निश्चय रोशन आगरकर यांनी घेतला.

आठ—दहा विद्यार्थी सोडून कोणालाच व्यवस्थित मराठी लिहिता येत नव्हते.  गणिताचीही तशीच परिस्थिती. आगरकरांचे विविध प्रयोग सुरू झाले. यात इतर सहकारी शिक्षक व विशेषत: प्रवीण रणदिवे या शिक्षकाचे सहकार्य होतेच. रोज विद्यार्थ्यांना  दीड तास आधी बोलावून विशेष वर्ग सुरू झाला. गणिताचा सराव पाठक मॅडम करून घेत होत्या. हे विद्यार्थी रोज शाळेत आले पाहिजे यासाठी घरच्यांचे समुपदेशन करवण्यात आले.  शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवसांमध्येही अधिकचे वर्ग सुरू राहिले.

आगकर सरांच्या या प्रयत्नामुळे सर्वाच्या नजरा या आता ‘दहावी छ’कडे लागून होत्या.  परीक्षा झाली आणि इतिहासात कधीही शंभर टक्के निकाल न देऊ शकलेल्या शाळेचा ‘दहावी छ’मुळे शंभर टक्के निकाल जाहीर झाला. चार विद्यार्थी ७५ टक्क्यांच्या वर होते. निकाल ऐकून आगकरांचे डोळे पान्हावले. परिश्रम, वेळ, संस्कार, अभ्यासाचे चीज झाले होते.