महेश बोकडे

करोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून उपाय केले जात आहेत. त्याअंतर्गत बऱ्याच शहरांत जमावबंदी आहे. त्यामुळे राज्यात जवळपास रक्तदान शिबिरे बंद आहेत.  राज्यात सध्या आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे पुढे रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून सुदृढ आरोग्य असलेल्या नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करत रक्तदान करणे अत्यावश्यक आहे.

देशात रक्तदान होणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक वरचा आहे. येथे शस्त्रक्रिया होणाऱ्या सिकलसेल, थॅलेसेमिया आणि इतरही रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रोज सुमारे पाच ते साडेपाच हजार पिशव्या (युनिट) रक्ताची गरज भासते. परंतु त्या तुलनेत रक्त संकलण कमी होते. गेल्यावर्षी राज्यात १७ लाख २७ हजार पिशव्यांच्या जवळपास (ब्लड युनिट) रक्त संकलित झाले होते. ही संख्या प्रत्येक वर्षी वाढते. परंतु मार्चपासून करोना विषाणूचे रुग्ण महाराष्ट्रातही आढळू लागल्याने येथे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी शासनाने बऱ्याच जिल्ह्य़ांमध्ये जमावबंदी कायदा लागू केला आहे.

नागरिकांमध्ये करोनाची भीती निर्माण झाल्याने राज्यात गेल्या काही दिवसांपासून रक्तदान शिबीर जवळपास बंदच झाले आहे.  सध्याच्या परिस्थितीत राज्यातील रक्तपेढांमध्ये सात दिवस पुरेल एवढेच रक्त साठा शिल्लक आहे. परंतु राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून ८ ते १० दिवस पुरेल एवढे रक्त असल्याचा दावा केला जात आहे. हे रक्त संपल्यास व नवीन रक्त संकलित न झाल्यास राज्याच्या विविध रुग्णालयांत शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांना धोका आहे.