काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे संकेत; विमानतळावर जोरदार स्वागत

नागपूर : काँग्रेसमध्ये यापुढे वयस्क नेत्यांना सन्मानजनक निरोप आणि तरुणांना संधी दिली जाईल, असे संकेत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ते बुधवारी शहरात दाखल झाले. त्या निमित्ताने प्रेस क्लबमध्ये  आयोजित ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांचे नागपूर विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले.

पत्रकारांच्या प्रश्नाला मनमोकळेपणे उत्तर देताना पटोले यांनी आगामी काळात काँग्रेसमध्ये नवीन पिढीला वाव असल्याचे सांगितले. तरुणांना संधी दिली जाईल तर ज्येष्ठांचे काय, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, वरिष्ठांचा सन्मान राखला जाईल. परंतु  तरुणांना संधी देण्यात गैर काहीच नाही.  मोदी नाटक करण्यात पटाईत आहेत. शेतकरी नेते राकेश टिकेत यांचा केंद्र सरकारने छळ केला आणि आंदोलन चिरडून टाकण्याचे षडयंत्र रचले. त्यावर टिकेत हळवे झाले होते. त्यावेळी केंद्रातील मंत्र्यांनी टिकेत यांची थट्टा केली. राज्यसभेत मात्र पंतप्रधान मोदी यांनी कारण नसताना अश्रू ढाळले. त्यांनी ज्या पद्धतीने लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अवस्था करून ठेवली, खरे तर त्यासाठी मोदींनी अश्रू ढाळायला हवे. त्यांनी संसदेत प्रवेश करताना आणि संसदेत भाषण करताना अभिनय केला. त्यासाठी मोदींना नटसम्राट अशी पदवी दिली पाहिजे, असा टोलाही पटोलेंनी हाणला.

मोदी सरकारने शेतकरी विरोधी तीन आणि कामगारविरोधी कायदे केले. त्यांचा फटका शेतकरी, मजुरांना बसणार आहे. याविषयची जनजागृती मोहीम काँग्रेस हाती घेणार आहे. मोदी सरकारची हुकूमशाहीकडे होणारी वाटचाल आणि फडणवीस सकारने केलेल्या चुका. यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात क्रमांक एकवर आणण्यास फार काळ लागणार नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्याला महाराष्ट्रातून बळ दिले जाईल.  महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर बोलताना ते म्हणाले, आमच्या मंत्र्यांमध्ये स्मार्टनेसचा अभाव असल्याने चांगले काम करूनही त्यांची चर्चा होत नाही. काँग्रेसकडे ऊर्जामंत्री पद असून करोनाच्या काळातील वीज देयक माफ व्हावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे,आमदार राजू पारवे, रवींद्र दरेकर, राजेंद्र मुळक, राहुल ठाकरे, राहुल पुगलिया, मारोतराव कोवासे, रमन पैगवार, मुजीब पठाण, बंटी शेळके, शेख हुसेन, प्रज्ञा बडवाईक, सुरेश भोयर, नाना कंभाले, मनोहर कुंभारे, नाना गावंडे, नरेंद्र जिचकार, राकेश पन्नासे, गिरीश पांडव, संजय महाकाळकर, प्रशांत धवड उपस्थित होते.

गणेश टेकडी, दीक्षाभूमी, ताजाबादला भेट

पटोले यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते बॅनर, फलक, ढोल-ताशे घेऊन विमानतळावर आले होते. पटोले विमानतळाच्या बाहेर येताच  ‘आले रे आले नानाभाऊ आले’ गीत वाजवण्यात आले.  त्यानंतर खुल्या जीपवर पटोले यांच्यासह शहराध्यक्ष विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, राजा तिकडे यांची मिरवणूक निघाली. ही मिरवणूक दीक्षाभूमी,  गणेश टेकडी मंदिर आणि मोठा  ताजाबाद येथे पोहचली.

पदवीधर निवडणुकीत भाजपची गटबाजी उघड

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही एकजूट होतो. पण, पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री गडकरी आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा वेगळा गट होता, असे पटोले म्हणाले.

काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नागपूर आगमनानिमित्त शहरातील विविध भागात  लावण्यात आलेले  स्वागताचे फलक महापालिकेने  हटवले. रहाटे कॉलनी,

रिझव्‍‌र्ह बँक चौक, टी पॉईंट या भागातील आठ फलक महापालिकेने जप्त केले.