पीक आणि प्राण्यांसाठीही सुरक्षित

जंगलालगतच्या गावांमधील शेतांत तृणभक्षी प्राण्यांच्या हैदोसामुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी वनखात्याने कितीही मदत जाहीर केली तरी त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणारे नाही. यामुळे तृणभक्षी प्राण्यांचा शेतातील हैदोस देखील थांबणार नाही. मात्र, एका तरुणाने शोधलेले ‘अहिंसक यंत्र’ शेतकऱ्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय ठरत आहे. शेतकऱ्यांना फायदा आणि वन्यप्राणीही सुरक्षित राहतील, असे दोन्ही हेतू यामुळे साध्य झाले आहेत.

रोही, नीलगाय, हरिण यासारख्या तृणभक्षी प्राण्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहेत. प्रामुख्याने जंगलालगतच्या गावांमधील शेतकरी या वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे त्रासलेले आहेत. वनखात्याकडून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते, पण ती पुरेशी नसून वेळेत मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनीच आता त्यावर पर्याय शोधला आहे. शेतात जिवंत विद्युत तारा सोडल्या जातात. यामुळे तृणभक्षी प्राण्यांसोबतच त्यांच्या मागावर येणारे वाघ आणि बिबट देखील मृत्युमुखी पडत आहेत.  काही वर्षांपूर्वी नागपूरच्या एका तरुणाने अवघ्या दीड ते दोन हजारात सौर कुंपणाचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. लोणारच्या एका तरुणाने ‘अहिंसक यंत्र’ तयार केले आहे. यामुळे वन्यप्राणीही मृत्युमुखी पडत नाहीत आणि त्याच्या वापरानंतर ते शेताकडे देखील वळत नाहीत. सचिन कापुरे यांनी ते यंत्र तयार करण्यासाठी  विज्ञानातील संज्ञा वापरली. काबरेनेटच्या खडय़ावर पाणी टाकले तर गॅस तयार होतो आणि त्याला आगीची जोड दिली तर स्फोटकासारखा आवाज होतो. मात्र, हे माणसांसाठी आणि वन्यप्राण्यांसाठीसुद्धा घातक नाही. सुमारे दहा वष्रे पुण्यात मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये नोकरी केल्यानंतर ते लोणारला परत आले आणि त्यांनी स्वत:ला या सामाजिक कार्यात झोकून दिले. शेतीसाठी या एका प्रयोगाबरोबरच त्यांनी जैवखत, पक्ष्यांसाठी खाद्य आणि शेतीपूरक, पण पर्यावरणपूरक प्रयोग केले आहेत.

पीव्हीसी पाईपचा वापर

साधा पीव्हीसीचा जड पाईप घेऊन त्याच्या जोडणी असलेला भाग उघडून त्यात काबरेनेटचा खडा टाकतात. त्या खड्डय़ावर पाणी टाकल्यानंतर लगेच तो जोडतात. यामुळे पाईपच्या आत गॅस तयार होतो. यानंतर जोडणीच्या शेवटच्या भागाला गॅस  लायटर लावले की पाईपच्या समोरच्या टोकातून स्फोटकासारखा आवाज येतो. सुमारे महिनाभरापूर्वीच सचिन कापुरे यांनी हे यंत्र तयार केले. शेतात एक-दोनदा त्याचा आवाज केल्यानंतर पुन्हा वन्यप्राणी शेताकडे वळूनही पाहात नाहीत.

‘‘हा प्रयोग मी पाचव्या वर्गात असताना एका पुस्तकात वाचला होता. त्यानंतर मी तेव्हा एक छोटेसे यंत्र तयार केले. आता जेव्हा शेतकरी पीक वाचवण्यासाठी शेतातील कुंपणावर विजेचा प्रवाह सोडतात आणि त्यात प्राणी मृत्युमुखी पडतात, हे पाहून  खंत वाटत होती. लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग नव्हता. त्यावेळी या प्रयोगाची आठवण झाली आणि हे यंत्र तयार केले. अवघ्या एक हजार रुपयात हे ‘अहिंसक यंत्र’ तयार होते.’’

– सचिन कापुरे