29 September 2020

News Flash

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा कचऱ्यापासून जैविक खत प्रकल्प

२८ शाळांचा सहभाग, कचरा विल्हेवाटीच्या प्रश्नावर तोडगा

जैविक खत तयार करताना राममनोहर लोहिया शाळेतील विद्यार्थी.

२८ शाळांचा सहभाग, कचरा विल्हेवाटीच्या प्रश्नावर तोडगा

शाळांमध्ये किंवा परिसरात पालापाचोळा किंवा अन्य कचरा मोठय़ा प्रमाणात गोळा होतो. तो दररोज स्वच्छही केला जातो. मात्र, हा कचरा कुठे टाकावा हा चिंतेचाच विषय असतो. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी कचऱ्यापासून जैविक खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला. त्याला आता  चांगला प्रतिसाद मिळत असून शहरातील २८ महापालिकेच्या शाळांमध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे.

स्वच्छता अभियान राबवताना महापालिकेने ओला व सुका कचरा नियोजन करून त्यापासून खतनिर्मिती करावी, या दृष्टीने शहरातील सोसायटी आणि निवासी संकुलांना सूचना केल्या. काहींनी हा प्रकल्प सुरू केला. आता शहरातील महापालिका शाळांमध्येही हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत माहिती दिली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र आपली शाळा, शाळेचा परिसर स्वच्छ राहावा याबाबत गेल्या काही वर्षांत कुठलेच प्रयत्न होत नव्हते. पावसाळ्याच्या दिवसात शाळेसमोर चिखल आणि कचऱ्याचे साम्राज्य राहायचे. शहरात महापालिकेच्या १५३ शाळा आहेत, त्यात माध्यमिक शाळा ३५ आहेत. येथील विद्यार्थ्यांनी हे अभियान राबवले. राष्ट्रीय हरित सेनेच्या पुढाकाराने राम मनोहर लोहिया या महापालिका शाळेतील शिक्षक संतोष विश्वकर्मा यांनी प्रारंभी शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या मदतीने सिमेंटचे टाके बांधले. त्या टाक्यात खतनिर्मितीसाठी लागणारी सुविधा निर्माण केली आणि त्यात दररोज शाळेत आणि परिसरात जमा होणारा कचरा टाकला. शिवाय विद्यार्थ्यांच्या घरातील आणि परिसरात जमा होणारे निर्माल्य व अन्य कचरा ते घेऊन येत होते. शाळांमध्ये शालेय पोषण आहारतंर्गत खिचडी दिली जात होती. मात्र, अनेकदा ती उरल्यावर फेकून दिली जात होती. ती  सुद्धा टाक्यामध्ये जमा केली गेली. शाळेमध्ये आजी- माजी २५ विद्यार्थ्यांचा गट तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आता या कचऱ्यापासून रोज १ ते दीड टन खत निर्माण होत आहे.

खताच्या विक्रीतून विद्यार्थ्यांना पारितोषिके

महापालिका शाळेतील पर्यावरण विषयाशी संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांची मदत घेऊन गणपती उत्सवाच्यावेळी तलावाच्या ठिकाणी निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम राबवला. जामदार शाळा, वनिता विकास, लोकांची शाळा येथे खड्डे करून त्या ठिकाणी खत तयार केले. त्यानंतर महापालिकेच्या दत्तात्रयनगरमधील शाळेत १९९८मध्ये निसर्ग विज्ञान मंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू केल्यानंतर महापालिका शाळेत हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राममनोहर लोहिया शाळेत प्रारंभी राबवला. शाळेतील शिक्षकांनी आर्थिक मदत करत टाके बांधले. यंत्रणा उभी केली आणि प्रकल्प सुरू केले. त्याला प्रतिसाद मिळाल्यावर आता महापालिकेचे अतिरिक्त  आयुक्त राम जोशी यांच्या पुढाकाराने २८ शाळेत हा उपक्रम राबवला जात आहे, जैविक खत तयार करून ते विकले जात आहे आणि त्या पैशातून शाळेतील विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि मदत केली जात आहे.    – संतोष विश्वककर्मा, शिक्षक.

शिक्षकांनी आर्थिक सहकार्य केले

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासोबत शाळेत उपक्रम राबवावा, या दृष्टीने महापालिकेच्या शाळेत कचऱ्यापासून जैविक खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला. महापालिकेने यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद केली नाही. शिक्षकांनी आर्थिक सहकार्य केले.     – राम जोशी, अति. आयुक्त, महापालिका.

दररोज अर्धा तास देतो

शाळेमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प राबवताना आम्हाला स्वच्छतेविषयी आवड निर्माण झाली. शाळेतील शिक्षकांनी आम्हाला प्रशिक्षण दिल्यानंतर दररोज अर्धा तास या प्रकल्पासाठी देत असतो.     – आदित्य सोनकुसरे, विद्यार्थी, राममनोहर लोहिया शाळा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 12:51 am

Web Title: organic fertilizer production project
Next Stories
1 पंतप्रधान आवास योजनेचे रस्त्यावर अतिक्रमण
2 उपराजधानीत ‘स्वाईन फ्लू’ नोंदीचा घोळ
3 लोकजागर : विदर्भ स्थिर, नेतेच ‘वेगळे’! 
Just Now!
X