पुन्हा टाळेबंदीच्या निर्णयाला कडाडून विरोध

नागपूर : शहरात करोनाचे वाढते रुग्ण बघता पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी आठवडय़ाभरासाठी टाळेबंदी जाहीर केली. मात्र यामुळे कसेतरी सुरू असलेले व्यवसाय पुन्हा अडचणीत येणार असल्याने शहरातील व्यापारी, दुकानदारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

गेल्यावेळी टाळेबंदी जाहीर केल्याने मोठय़ा उद्योगांना टाळे लावण्याची वेळ आली होती. यामुळे लाखो कामगारांना रोजगार गमवावा लागला.त्यामुळे व्यावसायिक, उद्योजक, कामगार कर्मचारी अशा अनेकांना आíथक अडचणी आल्या होत्या. टाळेबंदी शिथिलकरणाच्या टप्प्यानंतर अनेकांचे व्यवसाय अद्याप सावरलेले नाहीत. पहिल्या टाळेबंदीतून अजूनही अनेकांचे व्यवसाय रुळावर आलेले नाहीत. अशावेळी आता १५ ते २१ मार्च दरम्यान पुन्हा टाळेबंदी जाहीर केल्याने दुकानदारांसह व्यापाऱ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. हॉटेल व्यावसायिक, कापड विक्रेते, कुलर व्यावसायिक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेत्यांसह इतरही व्यापारी आधीच संकटात सापडले आहेत.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहे. या दिवसात कपडय़ांपासून तर दागिन्यांची खरेदी मोठय़ा प्रमाणात होत असते. मात्र टाळेबंदीत ही सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. टाळेबंदीच्या या आठ दिवसात त्यांना लाखो रुपयांचे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागणार आहे. शिवाय सध्या कुलरचा व्यवसायाचा हंगाम जोरात सुरू आहे.  उपराजधानीत उन्हाळ्याची चाहूल लागल्याने नागरिकांकडून कुलर खरेदी सुरू झाली आहे. व्यावसायिकांनीही लाखो रुपये गुंतवणूक करून माल खरेदी केला आहे. मात्र नेमक्या व्यवसायाच्या दिवसातच टाळेबंदी लागू केल्याने व्यापारी पुरते हतबल झाले असून टाळेबंदीचा विरोध करीत आहेत. टाळेबंदीकाळात  बांधकाम क्षेत्राशी निगडित कामे सुरू ठेवण्यास परवानगी असली तरी हार्डवेअरची दुकाने बंद असणार आहेत. वाहन दुरुस्तीचे गॅरेज देखील बंद असल्याने ते देखील संकटात आले आहेत. सध्या मुलांच्या ऑनलाईन शाळा सुरू असल्या तरी पुस्तकांची दुकाने बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांनाही अडचणी येणार आहेत. या आठ दिवसांच्या टाळेबंदीमुळे व्यापाऱ्यांपासून कामगार व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. परिणामी, या टाळेबंदीबाबत विरोधाचे स्वर उमटत आहेत.

मार्च महिन्यात व्यापाऱ्यांना व्यवसायानिमित्त अनेक कामे असतात. २० मार्च रोजी जीएसटी भरण्याची तारीख आहे, सीएकडे अनेक कामे असून त्यांचे कार्यालय सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. तसेच व्यवसाय कसातरी सुरू असताना पुन्हा टाळेबंदी जाहीर झाल्यामुळे अडचणी वाढणार आहेत. पण टाळेबंदीला आमचे समर्थन आहे.

– अश्विन मेहाडिया, अध्यक्ष एनव्हीसीसी.