नितीन गडकरी यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

नागपूर : राज्य सरकारने खरेदी बंद केल्याने अडचणीत सापडलेल्या राज्यातील १८७ कृषी उपकरण निर्माते उद्योजकांच्या अडचणी दूर करा, असे विनंती करणारे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठवले आहे.

कृषी उपकरण निर्माते उद्योजकांची संघटना अ‍ॅग्रो इम्लीमेंट मॅनिफॅक्चरर असोसिएशनच्या (एआयएमए) शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. केंद्राच्या सूचनेनुसार राज्यात डीबीटी (रोख रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे) योजना लागू केल्याने सरकारकडून  होणारी कृषी उपकरणांची खरेदी बंद झाली. परिणामी उपकरण निर्माते राज्यातील १८७ उद्योग अडचणीत आले. तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचाही  प्रश्न निर्माण झाला, याकडे शिष्टमंडळाने गडकरी यांचे लक्ष वेधले होते. गडकरी यांनी यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून या उद्योजकांच्या समस्या सोडवण्याची विनंती केली आहे. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग श्रेणीत हे उद्योग येतात. त्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्राने घ्यावा, अशी विनंती गडकरी यांनी केली आहे.