News Flash

कर्ज न मिळाल्याने पतंजलीचा मिहानमधील फूड पार्क अडचणीत

सरकारने मिहान-सेझमध्ये अधिकाधिक उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न केला

दहा हजार रोजगार मिळण्याची अपेक्षा फोल ठरणार?

नागपूर : दहा हजार रोजगार मिळतील या अपेक्षेने मिहानमध्ये शेकडो एकर जमीन स्वस्त दरात दिल्यानंतरही रामदेवबाबा यांचा ‘फूड व हर्बल पार्क’ उभा राहू शकला नाही. मिहानमधील जमिनीवर बँकेकडून कर्ज मिळण्यास विलंब होत असल्याने ही स्थिती उद्भवल्याची बाब आता समोर येत आहे.

सरकारने मिहान-सेझमध्ये अधिकाधिक उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न केला. विदर्भातील युवकांना रोजगार मिळावा आणि शेतकऱ्यांच्या पिकाची खरेदी व्हावी म्हणून पंतजली समूहाला स्वस्त दरात जमीन दिली.  हा प्रकल्प एका वर्षांत सुरू होईल, अशी घोषणाही झाली. मात्र, गेल्या तीन वर्षांत प्रकल्प सुरू करण्याची तारीख वारंवार बदलण्यात आली. आता प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन तीन वर्षे आणि दोन महिने झाले आहेत. परंतु कारखाना सुरू झाला नाही आणि युवकांना रोजगारही मिळाला नाही. उलट येथील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून  काढण्यात आले. तसेच यंत्र स्थापित करण्याची गतीही मंदावली आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

पतंजली समूहाला सिंडीकेट बँकेकडून कर्ज हवे आहे. ते मिळण्यास विलंब झाला.  सिंडीकेट बँकेने जमिनीच्या व्यवहाराची शहानिशा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी)कडे केली. पतंजलीने कर्जासाठी आवश्यक ९५ टक्के कागदपत्रे गोळा केली आहेत. संभावत: डिसेंबरमध्ये कर्ज मिळेल, असे एमएडीसीच्या सूत्रांनी सांगितले.

या प्रकल्पाचे भूमिपूजन १० सप्टेंबरला २०१६ ला झाले. त्यानंतर मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचा प्रचार करण्यात आल्याने विदर्भातील युवकांच्या अपेक्षा उंचावल्याा. मात्र, अजूनही येथे उत्पादन सुरू होऊ शकलेले नाही. पतंजली समूहाने शेकडो एकर जमीन मिहानमध्ये घेतली.

ही संपूर्ण जमीन रिकामी पडलेली असून येथे जनावरांचे कुरण झाले आहे.

केवळ २५ लाखात एक एकर जमीन

रामदेवबाबा यांच्या पंतजली समूहाला मिहानमध्ये  २५ लाख रुपये प्रतिएकर जमीन देण्यात आली. या प्रकल्पासाठी २३० एकर जमीन मिळाली आहे. या भागातील इतर उद्योजकांना ६० लाख ते १ कोटी रुपये दर आकारले जाते.

‘‘पंतजली समूहाने कोटय़वधींची गुंतवणूक केली आहे. विदेशातून यंत्रसामुग्री आणण्यात आली आहे. ही यंत्रे स्थापन करून लवकरच चाचणी घेण्यात येण्याची शक्यता आहे.’’

– योगेश धारकर, विपणन व्यवस्थापक, एमएडीसी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:27 am

Web Title: patanjali food park in mihan is in trouble due to not get loan zws 70
Next Stories
1 नागपूर जिल्ह्य़ात कावीळचे दोन बळी
2 अजित पवारांना शिक्षा झाली आहे का?
3 शासकीय विभागांच्या असमन्वयामुळे अडचणी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Just Now!
X