गुळगुळीत आणि रुंद रस्ते, त्याच्या बाजूला पादचाऱ्यांना चालण्यासाठी तेवढेच रुंद पथ, असे सुंदर चित्र एकेकाळी नागपूरचे होते. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या प्रयत्नामुळे हे शहर देशातील पहिल्या दहा ‘टॉप सिटी’त गणले जाऊ लागले होते. मात्र, त्यानंतर महापालिकेत आलेल्या सत्ताधाऱ्यांना व तेथील अधिकाऱ्यांना सुद्धा हे चित्र कायम ठेवता आले नाही, आज शहरातील रस्ते सिमेंटचे होत असले तरी त्याबाजूने चालण्यासाठी बांधण्यात आलेल्या पदपथांची अवस्था दयनीय झाली आहे.

कुठे टाईल्स निघाल्या, कुठे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले तर कुठे खसगी बांधकामातच ते गडप झाले आहेत. यावर झालेल्या कोटय़वधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. एकीकडे दरवर्षी विविध करांमध्ये वाढ करून महापालिका नागपूरकरांच्या खिशातून पैसे काढत असताना त्याचा असा अपव्यय हा लोकांच्या संतापाचा विषय ठरला आहे. एकात्मिक रस्ते विकास योजनेतून शहरातील ४३ रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. याच वेळी रस्त्यांची रुंदी लोकांना कळली. शहरातील वर्दळीच्या ठिकाणांपासून तर बाजारपेठ आणि इतर वस्त्यांपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ते मोठे आणि गुळगुळीत करण्यात आले होते. त्याच्याबाजूने तेवढेच मोठे पदपथही बांधण्यात आले होते. बर्डी, सदर, महाल, गोकुळपेठ,सक्करदरा, गांधीबाग, इतवारी यासारख्या वस्त्यांमध्ये रुंद पदपथ हे जणू स्वप्न वाटत होते. मात्र, शहराचे हे लोभसवाणे रूप महापालिकेला व तेथील सत्ताधाऱ्यांना नंतरच्या काळात टिकवता आले नाही. कधी जलवाहिनीसाठी, कधी टेलिफोनच्या केबलसाठी तर कधी खासगी कामांसाठी पदपथ तोडण्यात आले. त्यावरच्या टाईल्स काढण्यात आल्या. आज शहराच्या कुठल्याही भागात गेल्यावर पदपथाची अवस्था किती दयनीय झाली आहे. २०१३ मध्ये महापालिकेने ४३ प्रमुख रस्त्यांवरील पदपथांची दुरुस्ती करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर दरवर्षी कमी अधिक प्रमाणत हा खर्च सुरूच आहे. मात्र, एकीकडे टाईल्स लावायच्या व दुसऱ्या विभागाने त्या कोणत्यातरी कामासाठी  उखडून टाकायच्या असे लोकांच्या पैशाचा अपव्यय करण्याचे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील पदपथांचे देता येईल. वर्धामार्गावरील हॉटेल प्राईडपासून तर रहाटे कॉलनीपर्यंतच्या दोन्ही बाजूंच्या पदपथावरील टाईल्स संपूर्णपणे निघाल्या आहेत. काही टाईल्स केबलच्या कामासाठी काढण्यात आल्या व त्या थातूरमाथूर पद्धतीने पुन्हा लावण्यात आल्या. पण काही दिवसांनी त्या पुन्हा निखळल्या. आज त्या ठिकाणी माती साचली आहे. काही ठिकाणी झाडे उगविली आहेत.

अशीच अवस्था देवनगर चौक ते खामला चौक, अजनी चौक, आरपीटीएस, दक्षिण नागपुरात मेडिकल चौक परसिरातील रस्ते, मध्य नागपुरातील अशोक चौक ते नंदनवन चौक, घाटरोडच्या बाजूचे पदपथ तेथे सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांमुळे उखडले आहेत.

सामान्यांच्या पैशाचा अपव्यय

महापालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सोयी, सुविधांसाठी नागरिकांकडून कर वसूल केला जातो. त्यामुळे त्यांना सुविधा देण्याची जबाबदारी ही महापालिकेचीच आहे. सध्या पदपथांची अवस्था  पाहिल्यावर महापालिका जबाबदारी पार पाडत नसल्याचे स्पष्ट होते. पदपथांच्या दुरुस्तीवर होणारा खर्च हा लोकांच्या पैशाचा अपव्यय आहे. कारण दुरुस्ती केल्यावरच तेथे पुन्हा वेगवेगळ्या कामासाठी खोदकाम केले जाते.

– दिनेशकुमार नायडू माहिती अधिकार कार्यकर्ते, सोनेगाव.

संगनमताने गैरव्यवहार

दरवर्षी पदपथ दुरुस्ती आणि रस्ते दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च केले जातात, प्रत्यक्षात काही महिने लोटले की पदपथ आणि रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे होते, गेल्या दहा वर्षांत याची कोणीच जबाबदारी स्वीकारली नाही, यामुळे यात महापालिकेतील सत्ताधारी, अधिकारी आणि कंत्राटदार यांचे संगनमत असावे हे स्पष्ट होते. दुरुस्तीवर होणारा खर्च लोकांकडून गोळा केलेल्या कराच्या रकमेतून होत असतो व त्याचा असा अपव्यय होणे हे चुकीचे आहे.

– जम्मू आनंद, महापालिका कर्मचारी संघटनेचे नेते.