सोमवारी एकूण १ लाख रुपयांचा दंड वसूल

नागपूर : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासन गेल्या पाच महिन्यांपापसून मुखपट्टी आणि शारीरिक अंतर राखण्याचे आवाहन जनतेला करीत आहे. मात्र, महापालिकेच्या मुख्यालयातच या आवाहनाला महत्त्व दिले जात नसल्याचे लक्षात आल्याने आज सोमवारी सिव्हिल लाईन्स मुख्यालयात सात जणांविरुद्ध व महापौर निवास असलेल्या लक्ष्मीनगर झोनमध्ये मुखपट्टी न लावणाऱ्या २६ जणांविरुद्ध करावाई करण्यात आली.

सोमवारी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मुखपट्टी न लावणाऱ्या ५०१ नागरिकांविरुध्द कारवाई केली आणि त्यांच्याकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल केला. मागील चार दिवसात शोध पथकांनी ११३६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. २,२७,२०० चा दंड वसूल केला आहे. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २६, धरमपेठ झोन अंतर्गत १०२, हनुमाननगर झोन अंतर्गत ४३, धंतोली झोन अंतर्गत ५२, नेहरुनगर झोन अंतर्गत ४०, गांधीबाग झोन अंतर्गत ३८, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १८, लकडगंज झोन अंतर्गत ५०, आशीनगर झोन अंतर्गत ६२, मंगळवारी झोन अंतर्गत ६३ आणि महापालिका मुख्यालयात ७ जणांविरुध्द सोमवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसिंग तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.