विद्यार्थिनीची उच्च न्यायालयात याचिका; ‘सीबीएसई’ला नोटीस

यंदा बारावी परीक्षेदरम्यान गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांमधील चुकीच्या प्रश्नासाठी सीबीएसईने दिल्लीतील विद्यार्थ्यांना गणितासाठी १०, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रासाठी प्रत्येकी ८ गुणांची सरसकट वाढ दिली. मात्र, देशभरात एकच प्रश्नपत्रिका असताना उर्वरित भागातील विद्यार्थ्यांना हे गुणदान का दिले नाही, असा सवाल करणारी याचिका नागपुरातील एका विद्यार्थिनीने दाखल केली.

आयुषी दीक्षित असे या विद्यार्थिनीचे नाव असून याचिकेवर बुधवारी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. रोहित देव यांच्यापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर सीबीएसईला नोटीस बजावली असून १९ जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

आयुषी बारावीच्या परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयात काही गुणांनी नापास झाली. त्यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकाकर्त्यांनुसार, या तीनही विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये चुका होता. त्यामुळे दिल्लीतील विद्यार्थ्यांनी तेथील खंडपीठात याचिका दाखल केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. तसेच पेपरच्या गुणांकनात दुरुस्ती  व फेरतपासणीची पद्धतही सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर मंडळाने दिल्लीतील विद्यार्थ्यांना गणित-१०, भौतिकशास्त्र-८ आणि रसायनशास्त्र-८ अशी सरसकट गुणवाढ जाहीर केली होती. शिवाय मॉडरेशन व फेरतपासणी बंद करण्याचा निर्णय कायम ठेवला, असे या याचिकेत म्हटले आहे. देशात एकच प्रश्नपत्रिका असताना केवळ दिल्लीतील मुलांना गुणवाढ का, असा सवाल करीत याचिकाकर्त्यां विद्यार्थिनीने सर्व मुलांना गुणवाढीचा निर्णय घ्यावा.मॉडरेशन व फेरतपासणीची पद्धत सुरू करून याचिकाकर्त्यां विद्यार्थिनीच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासून २५ जूनपर्यंत निकाल जाहीर करावेत, अशी विनंती केल्याचे अ‍ॅड. भानुदास कुळकर्णी यांनी सांगितले.