सध्या उपराजधानीतील अनेक घरात ग्वालबंशीच्या लुटीच्या कथा चर्चिल्या जात आहेत. ही चर्चा करणाऱ्यांमध्ये या माफियाकडून फसवले गेलेले आहेतच, शिवाय भूखंड खरेदीत इतर ठिकाणी फसवणूक होऊन मन:स्ताप सहन करणारे सुद्धा आहेत. हा कोण कुठला ग्वालबंशी? उत्तर भारतातून येथे दुधाचा धंदा करण्यासाठी येतो काय? भूखंड लाटून लोकांना फसवतो काय? राजकारणात स्थान मिळवतो काय? या अशा अनेक विस्मयकारक प्रश्नांनी या चर्चेचे स्वरूप अधिकाधिक व्यापक होत आहे. मूळात अशा प्रकरणाकडे वरवर न बघता खोलवर जाऊन विचार केला तर ग्वालबंशी ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे असे अनेकांच्या लक्षात येईल. नागपुरात त्याचे नाव ग्वालबंशी असेल तर इतर ठिकाणी आणखी वेगळे असेल. प्रत्येक ठिकाणी  अशा प्रवृत्ती उगम पावतात, फोफावतात, एखादे प्रकरण समोर आले की त्यावर कारवाई व चर्चा होते. नंतर सारे विस्मरणात जाते. अशा प्रवृत्तीपासून फसवले गेलेल्यांना काहींना न्याय मिळतो, तर काहींची प्रकरण विस्मृतीत गेल्यावरही फरफट सुरूच राहते. प्रकरण चर्चेत आल्यावर सुरू झालेल्या कायदेशीर कारवाईने अशा प्रवृत्तीला आळा बसतो का, या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने का होईना पण नाही असेच येते. फसगत झालेल्या लोकांची ओरड थोडी शांत झाली आणि आयुष्यभर चालू शकणारी न्यायालयीन प्रक्रिया एकदा सुरू झाली की अशा प्रवृत्ती पुन्हा काहीच घडले नाही अशा थाटात समाजात वावरू लागतात. राजकारणात त्यांना पुन्हा सन्मान मिळू लागतो. मग याच व्यक्ती पुन्हा भाषणे ठोकण्यासाठी तत्पर असतात. गरीब, शोषितांना न्यायाची भाषा त्यांच्या तोंडी असते. लोकही ही भाषणे ऐकतात. टाळ्या वाजवतात. अशा प्रवृत्तीला पुन्हा पुन्हा निवडून देत, त्यांचे राजकारणातले स्थान अधिक घट्ट करतात. ज्याची जास्तीत जास्त बदनामी होते तो सर्वाधिक लोकप्रिय याच लाटेवर सध्या समाजातील अनेकजण स्वार झाले आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तींना बदनामी व फसवणुकीनंतरही समाजात मानाचे स्थान मिळत राहते.

राजकारणी अशांना जवळ करतात कारण या प्रवृत्तीच्या मागे मतांचा गठ्ठा असतो. हे असे वारंवार का घडते, या प्रश्नाचे उत्तर आपल्या सदोष समाजव्यवस्थेत दडले आहे. ही व्यवस्था आणखी सक्षम कशी करता येईल यावर सध्या कुणीच विचार करत नाही, याचे कारण व्यक्तीला मोठे करण्याला आलेले महत्त्व हे आहे. त्यामुळे ग्वालबंशीला नावे ठेवून कोणताही फायदा होणार नाही. साऱ्या राजकीय पक्षांना आपल्या गायीच्या गोठय़ातील दावणीला बांधणारी ही प्रवृत्ती भविष्यात मोठी होईल, आणखी निवडून येईल, अधिकचा मानसन्मान मिळवेल याविषयी कुणीही तीळमात्र शंका बाळगण्याचे काही कारण नाही. अशा पद्धतीच्या प्रवृत्तीचा उदय आणि विस्तार हा एकप्रकारे आपल्या विचार पद्धतीचा सुद्धा दोष आहे. ज्याला आपण फसवणूक म्हणतो त्याला ही प्रवृत्ती व्यवसाय समजते. ग्वालबंशीने तेच केले. केवळ दुधाचा व्यवसाय करून या महाशयाला राजकारणात स्थान मिळवता आले नसते. त्यासाठी त्याने या अनोख्या पण सर्वच प्रमुख शहरात प्रचलित असलेल्या भूखंड लाटण्याचा व्यवसाय सुरू केला. जागा भलत्याची, त्यावर अतिक्रमण करायचे, गरिबांना झोपडय़ा द्यायच्या, नंतर प्रकरण न्यायालयात गेले की दबंगगिरी करून तडजोड करायची, जमीन एकदा ताब्यात आली की तीच जागा दुसऱ्याला विकायची, तिथल्या झोपडपट्टीधारकांना आणखी नव्या आणि तेही दुसऱ्याच्याच जागेवर वसवायचे आणि यातून बक्कळ पैसा मिळवत राहायचा असे या व्यवसायाचे स्वरूप. येथे ग्वालबंशीने हा व्यवसाय केला, इतर शहरात दुसरे ग्वालबंशी आहेत. या साऱ्यांची राजकारणात उठबस असते. जरा आपापल्या शहरातील अशा भूखंड माफियांची नावे नजरेसमोर आणून बघा, तुम्हाला ठिकठिकाणी ही प्रवृत्ती दिसू लागेल. या प्रवृत्तीचे राजकारणही चौफेर असते. सत्ताधारी, विरोधक असे सारेच गळाला लावणे त्यांच्यासाठी सोयीचे असते आणि राजकारण्यांना सुद्धा अशा प्रवृत्ती पदरी बाळगणे फायद्याचे असते. कारण एकच, निवडून येण्याचा निकष व पैसे खर्च करण्याची ताकद या कसोटीवर या प्रवृत्ती पुरेपूर उतरत असतात. या व्यवहारात कुठेही गरिबाच्या कल्याणाची भाषा नसते हे विशेष! आता ग्वालबंशीने उभे केलेले झोपडय़ाचे साम्राज्य तोडायला सुरुवात झाल्याबरोबर गरिबांचे आक्रोशग्रस्त चेहरे माध्यमात झळकू लागले आहेत. त्यावर फुंकर घालण्यासाठी पुढे येणारे नेते ग्वालबंशी विरुद्ध चकार शब्दही बोलत नसतात. आम्ही चुकीच्या माणसाला राजकारणात पुढे आणले अशी कबुली हे राजकीय पक्ष कधीच देत नसतात. या गरिबांना न्याय मिळवून देऊ अशी भाषा मात्र हे पक्ष आवर्जून करतात. कारण याच भाषेची राजकारणात चलती होती, आहे व पुढे राहणार आहे. कारवाईचा हा धडाका आटोपल्यानंतर गरिबांचे हे आवाज नक्की लुप्त होतील याची जाणीव या साखळीतील सर्वाना असते. मग अशा प्रवृत्ती, त्यांची केलेली फसवणूक जगासमोर मांडणारे काही मोजके लोक तेवढे उरतात व न्यायालयीन लढाईच्या चक्रात पार गुरफटून जातात. प्रकरणाची चर्चा थांबली की दिवाणी वाद सुरू होतात. अशी प्रकरणे हाताळण्यात या प्रवृत्ती एकदम माहीर असतात. या वादात विजय कसा मिळवायचा, कधी मिळवायचा, प्रकरण किती लांबवायचे याचेही आखाडे ठरलेले असतात.

त्यानुसार वाटचाल सुरू होते व अनेकदा तक्रारकर्ते थकेपर्यंत ती संपतच नाही. अशा प्रवृत्ती व तक्रारकर्ते यांच्यात मग कधीतरी तडजोड होते. न्याय मिळण्याच्या आधीच प्रकरणे बाहेरच्या बाहेर निकाली निघतात आणि अशा प्रवृत्तीच्या दुधाळ धंद्याला पुन्हा बरकत येऊ लागते. ही पांढरपेशी प्रवृत्ती आज व्यवस्थेचा भाग बनली आहे ती याच साऱ्या कारणांमुळे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण, गुन्हेगारांचे राजकारण हे शब्द ऐकायला, बोलायला, भाषणात वापरायला ठीक आहेत.

वास्तवात मात्र व्यवस्थेने हे गुन्हेगारीकरण कधीचेच स्वीकारले आहे. केवळ भूखंड खरेदीतच नाही तर समाजात वावरताना अनेकांना त्याचा पदोपदी अनुभव येत असतो. त्यामुळे ग्वालबंशी हे गुन्हेगार नाहीच, ती एक प्रवृत्ती आहे हे आपल्याला मान्य करण्यावाचून पर्याय नाही.

devendra.gawande@expressindia.com