स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूर पोलीस दलातील तीन सहायक पोलीस उपनिरीक्षकांना राष्ट्रपदी पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात विश्वास श्यामराव ठाकरे, नितीन भास्करराव शिवलकर व अशोक सोमाजी तिडके यांचा समावेश आहे. शहर पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना हे पदक जाहीर झाले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय व पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी  तिघांचेही अभिनंदन केले आहे.

यातील ठाकरे हे १९८८ मध्ये पोलीस दलात दाखल झाले. त्यांना आतापर्यंत २८२ बक्षीस मिळाले. २०१२मध्ये त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले. तिडके हे १९८७ पासून पोलीस दलात सेवा देत आहेत. तिडके यांना ५२८ बक्षीस प्राप्त झाले. गुन्हे शाखेत कार्यरत तिडके यांनी १३१ गुन्हेगारांच्या तडीपारीचे, ३६ गुंडाच्या एमपीडीएचे प्रस्ताव तयार केले. उल्लेखनीय कार्याबाबत २०१५मध्ये तिडके यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्हही मिळाले. १९८७मध्ये पोलीस दलात दाखल झालेले शिवलकर यांनी २२२ बक्षीस प्राप्त केले.