प्रचारासाठी सहा महिन्यांत ३२ कोटींचा खर्च

देवेश गोंडाणे, नागपूर

निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय पक्षांचा सहा महिन्यांच्या जाहिरात खर्चाचा लेखाजोखा ‘फेसबुक’ने प्रसिद्ध केला असून देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी फेसबुक प्रचारासाठी ३२ कोटींची उधळपट्टी केल्याचे यातून समोर आले आहे. यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या ‘फेसबुक ’ पानावर सर्वाधिक ४ कोटी ३४ लाखांचा खर्च झाला असून त्यापाठोपाठ राष्ट्रीय काँग्रेसच्या पेजवर १ कोटी ८२ लाखांचा जाहिरात खर्च करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने पुन्हा संभाव्य उमेदवाराचा प्रचार, सभांचे प्रक्षेपण, प्रतिस्पर्धी पक्षांच्या चुकांवर बोट ठेवणारे व्हिडीओ, संदेश प्रसारित करण्यास सुरुवात झाली आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरसारखे माध्यम तरुणाईचा जीव की प्राण आहेत. संख्येने सर्वाधिक असलेले तरुण मतदार फेसबुकचा अधिक वापर करीत असल्याने राजकीय पक्षांनाही त्याची दखल घेणे भाग पाडले आहे.

फेब्रुवारी ते सप्टेंबर २०१९ या सहा महिन्यांत ४ कोटी ३४ लाखांचा खर्च करण्यात आला. सहा महिन्यांत एकटय़ा फेसबुकवर राजकीय पक्षांनी केलेल्या ३२ कोटींच्या खर्चामध्ये भाजपच्या विविध राज्यातील फेसबुकवरील प्रचाराचा सर्वात मोठा वाटा आहे.

* भाजपानंतर दोन वर्षांनी म्हणजे २०१३ मध्ये कॉँग्रेसचे अधिकृत फेसबुक पान तयार झाले. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून कॉँग्रेसने आतापर्यंत केवळ १ कोटी ८२ लाखांचा खर्च केले आहेत.

* प्रादेशिक पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ४ लाख २५ हजार, शिवसेना ४ लाख ६३ हजार तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेसबुकवरील प्रचारावर एक दमडीही खर्च केलेली नाही.

*  विशेष म्हणजे, फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या ४ कोटी ४० लाखांवर गेली असून विरोधी पक्षातील अन्य बडय़ा नेत्यांच्या सर्व फॉलोअर्सची गोळाबेरीज केली तरी मोदींच्या चाहत्यांचा आकडा गाठणे कठीण दिसते.

मुख्यमंत्री, आदित्य ठाकरेंमध्ये अघोषित स्पर्धा

महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी वैयक्तिक फेसबुक पानावरून प्रचाराला सुरुवात केली आहे. यात आदित्य ठाकरे यांनी सहा महिन्यांत ६६ हजार तर मुख्यमंत्र्यांनी १ लाख ७२ हजारांचा खर्च केला आहे.