News Flash

सिमेंट रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत सारवासारव

किरकोळ व कमी खोल असलेल्या भेगा दुर्लक्षित करण्याजोग्या असतात.

दहा नंबर पूल ते आवळे बाबू चौक या रस्त्याला गेलेले तडे

’  रस्त्यावरील भेगा ही सामान्य बाब, अधिकाऱ्यांचा दावा

’  तक्रारींची दखल घेणाऱ्या सक्षम यंत्रणेचा महापालिकेकडे अभाव

सिमेंट रस्त्यांच्या कामांना होणारा विलंब, रस्त्याला गेलेले तडे याबद्दल लोकांमध्ये नाराजी असून त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी महापालिकेकडे सक्षम यंत्रणाच नाही.

वॉट्स, इ-मेल, एसएमसद्वारे तक्रार मागवून त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य असताना महापालिकेचे मुख्य अभियंता उल्हास देबाडकर यांच्या म्हणण्यानुसार लोकांनी तक्रारी असल्यास त्यांना कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. दरम्यान, सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत लोकांनी असमाधान व्यक्त केल्याने महापालिका आता सारवासारव करू लागली आहे. दरवर्षी डांबरी रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर होणारा कोटय़वधी रुपयांचा खर्च  टाळण्यासाठी शहरातील रस्ते सिमेंटचे करण्यात येत आहेत. ते ५० वर्षे टिकतील असे सांगण्यात येत आहे, परंतु पहिल्या टप्प्यातील रस्त्यांना दीड ते दोन वर्षांतच तडे गेले.  दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यावर तर काही महिन्यातच भेगा दिसून आल्या आहेत. ‘लोकसत्ता’ने हा विषय लावून धरला होता. त्यावर महापालिकेने रविवारी खुलासा करण्यासाठी ‘जिओटेक’ या कंपनीचे ‘पॉवर पाईन्ट प्रेझेंटशन’ पत्रकारांना दाखविले. त्यात त्यांनी सिमेंट रस्त्याला वेगवेगळ्या कारणांमुळे किरकोळ भेगा पडणे सामान्य बाब आहे. किरकोळ व कमी खोल असलेल्या भेगा दुर्लक्षित करण्याजोग्या असतात. बहुतेक भेगा दुरुस्ता करता येतात. ३ मी.मी. पेक्षा जास्त रुंदीची असेल तर गांभीर्याने घेण्यासारख्या असतात, असे या सादरीकरणात सांगण्यात आले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव उपस्थित होते.

त्रयस्थ ऑडिटमध्ये महापालिकेला प्रतिनिधित्व हवे

महापालिका त्रयस्थांकडून ऑडिट करण्यास तयार असून त्यासाठी जनमंचला कोर कटिंगची परवानगी देण्यास देखील तयार आहे, परंतु टेस्टिंग जिथे कुठे होईल, त्यात महापालिकेचा प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. जनमंचने २९ एप्रिलला महापालिकेला पत्र दिले आणि १ मे महाराष्ट्र दिनी सिमेंट रस्त्यांची पाहणी केली. काही दिवस आधी पत्र दिले असते किंवा पाहणी दौरा थोडा उशिरा केला असता तर महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी रस्ते पाहणीसाठी उपस्थित राहिले असते, असे सत्ता पक्ष नेते संदीप जोशी म्हणाले.

पहिला टप्पा अपूर्ण

पहिल्या टप्प्यातील ३० पैकी १२ सिमेंट रस्त्यांची कामे झालेली नाहीत. यापैकी सात रस्त्यांची कामे कशामुळे थांबवली, याची माहिती महापालिकेकडे नाही. दोन रस्ते अतिक्रमणामुळे होऊ शकली नाही आणि मोक्षधाम चौक ते एसटी स्टँडपर्यंतचा रस्ता वाहतुकीची कोंडी होत असल्याने झाला नाही. चार रस्त्यांची कामे सुरू आहेत. या टप्प्यात ग्रेट नाग रोडवर केडीके कॉलेज ते बैद्यनाथ चौकापर्यंत काम झाले आहे. त्यात केडीके कॉलेज ते अशोक चौकादरम्यान रस्त्याला तडे गेले आहेत. कंत्राटदाराला दंड करणे किंवा तडे बुजवण्याचे काम हाती घेण्यासंदर्भात महापालिका विचार करेल, असे महापालिकेचे मुख्य अभियंता उल्हास देबाडकर म्हणाले.

दुसऱ्या टप्प्यात २६७ तडे

दुसऱ्या टप्प्यात ३३ रस्त्यांची कामे सुरू आहेत. या टप्प्यातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी ‘जिओटेक’ या खासगी कंपनीला नेमण्यात आले आहे. या कंपनीच्या पाहणीत रस्त्यांना २६७ तडे गेले आहेत. तडे किती मीटर गेले, किती रुंद आहेत, ते धोकादायक आहेत किंवा नाही, याचा चार महिन्याच्या अभ्यास केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार आहे, असेही देबाडकर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 5:38 am

Web Title: poor work of cement roads in nagpur
Next Stories
1 खापरखेडय़ाचाही एक वीजनिर्मिती संच बंद
2 तीस केंद्रांवर ‘नीट’ सुरळीत
3 महामार्गावरील मद्यबंदी दूर होण्याची शक्यता धुसर
Just Now!
X