रांजण, माठ , सुरई तयार, पण दुकान उघडणार कसे?

नागपूर :  गरिबांचा फ्रीज म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात मातीपासून तयार केलेल्या माठ व सुरईला मोठय़ा प्रमाणात मागणी असते.  कुंभार समाजाचा हा मोठा आर्थिक स्रोत असतो. मात्र गेल्या महिन्याभरापासून करोनामुळे हा व्यवसाय  अडचणीत आला आहे.  कुंभार बांधवांकडे रांजन, माठ , सुरईसह इतर मातीच्या वस्तू तयार आहेत. मात्र दुकाने लावण्यास मंजुरी नसल्यामुळे ते आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

विदर्भात ५० हजारांवर कुंभार बांधव हा व्यवसाय करतात.  माती भिजवण्यापासून चिखल तुडवणे, चाकावर या सर्व वस्तू तयार करण्यापर्यंत सर्वच कामे अत्यंत मेहनतीची आहेत. ही कामे आधी माणसांच्या सहाय्यानेच केली जायची. नंतर या व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमतेत वाढ करण्याचे प्रयत्न झाले. विजेच्या चाकावर मातीच्या वस्तू बनवण्याचा शोध प्रयोगशील कारागिरांनी लावला. या शोधामुळे हाताने चाक फिरवण्याचे कष्ट कमी झाले. त्या तुलनेत मातीच्या वस्तू बनवण्याचा वेगही वाढला.

या मशीनमुळे माती मळणीचे काम अत्यंत कमी वेळात आणि श्रमाशिवाय होऊ लागले. उत्पादनही दुप्पट होत असताना यावेळी मात्र करोनामुळे  वस्तूंना मागणी कमी झाली आहे.  मालवाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कुंभारांनी तयार केलेला माल शहरात येण्याऐवजी त्यांच्याकडेच पडून आहे.  ग्रामीण भागातील कुंभार बांधव या दोन महिन्यात ५० ते ६० हजार रुपये कमवत असतात. मात्र आता ५ हजारही मिळतील की नाही शंकाच आहे.

करोनामुळे  कुंभार समाजातील कारागिरांची अवस्था फारच वाईट झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मोठय़ा प्रमाणात कुंभार समाजातील कारागिरांनी तयार केलेले माठ, सुरई, रांजन आणि इतरही मातीपासून तयार केलेल्या वस्तू तशाच पडून आहेत. अशीच जर परिस्थिती राहिली तर कुंभार समाज मोठय़ा आर्थिक अडचणीत येणार आहे. अक्षय्यतृतीयेनंतर पैसा आला की कुंभार समाजातील मुलामुलींचे विवाह सोहळे होत असतात. मात्र आता परिस्थिती कठीण झाली आहे.

– सुरेश पाठक,  कुंभार समाजाचे नेते.

 

अक्षय्यतृतीयेला काय पूजणार?

येत्या २५ एप्रिलला अक्षय्यतृतीया आहे. या दिवशी घरोघरी माठ किंवा सुरई नेऊन त्याची पूजा केली जाते. यावेळी टाळेबंदीमुळे  विविध भागातील  माल  शहरात आला नाही. त्यामुळे यावर्षी माठ व सुरईविना लोकांना अक्षय्यतृतीया साजरी करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.