सदरमधील खासगी रुग्णालयाचा प्रताप

नागपूर : शहरातील सदर भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाबाधिताकडून पाच दिवसांच्या उपचाराचे देयक चक्क पाच लाख रुपये घेण्यात आले.

एका सामाजिक कार्यकर्ता व त्यांच्या पत्नीचा १६ ऑगस्टला करोनाचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर ते काही दिवस गृहविलगीकरणात राहून उपचार घेत होते. त्यानंतर दहा दिवसांनी त्यांनी पुन्हा चाचणी केल्यावर त्यांचा अहवाल पुन्हा सकारात्मक आला. यामुळे ते शालिनीताई मेघे रुग्णालयात गेले. मात्र तेथील दयनीय परिस्थिती बघून ते घरी परतले. त्यांनी शंकरनगरातील एका मोठय़ा रुग्णालयाशी संपर्क साधला मात्र खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तीन दिवस त्यांनी वाट बघितली. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने सदरमधील एका खासगी रुग्णालयात ते स्वत: आणि त्यांची पत्नी दाखल झाले.

पाच दिवस त्यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती बरी असल्याने त्यांना सहाव्या दिवशी पाच दिवसांचे पाच लाख रुपयाचे देयक हाती देण्यात आल्याने ते थक्क झाले. मात्र त्यांनी पूर्ण पाच लाखांचे देयक रुग्णालयाला दिले.

शहरातील अनेक मोठय़ा रुग्णालयात अशीच आर्थिक लूट असून यावर महापालिका प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे नागरिक भरडले जात आहेत.

उपलब्ध खाटांची माहिती समाज माध्यमांवर टाका

रुग्णालयात खाटा नसल्याचे सांगितले जाते, रुग्णांना कुठल्या रुग्णालयात जावे याची माहिती मिळत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने दररोज   खासगी व शासकीय रुग्णालयांचा आढावा घेत या रुग्णालयांमध्ये  किती खाटा उपलब्ध आहे याची माहिती दिली पाहिजे, अशी मागणी सामाजिक संस्था असलेल्या जनमंच या संस्थेने केली आहे. ज्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहे अशा रुग्णालयाची यादी समाज माध्यमांवर टाकली तर यामुळे प्रत्येक रुग्णाला त्याची माहिती मिळू शकेल.