मानव-वन्यजीव संघर्षांतून जेरबंद केलेल्या वाघांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू होण्याआधीच खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जेरबंद वाघ, बिबटय़ांच्या सुटके बाबत गठित राज्यस्तरीय समितीने नागपुरातील सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात जेरबंद वाघिणीला सोडण्यास अनुकूलता दर्शवली. या बैठकीला तब्बल एक महिना झाला. परंतु अद्याप वाघिणीच्या सुटके बाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. या संघर्षांत मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या वाघ, बिबटय़ांना जेरबंद करण्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, नागपुरातील गोरेवाडा बचाव केंद्रातील पिंजरेही आता फुल्ल झाले असून सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात या वन्यप्राण्यांना ठेवण्यात येत आहे. संघर्षांतून जेरबंद केलेल्या वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याबाबत राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. अशा संघर्षांत दोषी नसलेल्या वन्यप्राण्यांना जंगलात सोडण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला आहेत. मात्र, आजतागायत राज्यात इतक्या घटना होऊनही एकही वन्यप्राणी नैसर्गिक अधिवासात मुक्त झाला नाही. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस यवतमाळ जिल्ह्य़ातील पांढरकवडा येथून जेरबंद केलेल्या वाघिणीला सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात ठेवण्यात आले. वनमंत्री संजय राठोड यांनी २६ सप्टेंबरला या केंद्राला भेट दिली. त्या वाघिणीचा एकूण इतिहास आणि जेरबंद केल्यानंतर तिच्या वर्तणुकीविषयी  जाणून घेतले. त्यानंतरच या वाघिणीला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले. २८ सप्टेंबरला यासंदर्भात गठित राज्यस्तरीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत देखील सर्व सदस्यांनी तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याबाबत अनुकू लता दर्शवली. या बैठकीला एक महिना पूर्ण झाला. परंतु अजूनही वाघिणीच्या सुटके विषयी कोणतीच हालचाल नाही. याबाबत समितीचे अध्यक्ष व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) बी.एस. हुडा यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

जुने अनुभवही वाईटच

आठ ते नऊ वर्षांपूर्वी कातलाबोडी येथे विहिरीत पडलेल्या वाघिणीला अवघ्या दहा दिवसात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर गोसीखुर्दच्या कालव्यात अडकलेल्या वाघाला देखील नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. हे दोन्ही प्रयोग यशस्वी ठरले असताना जेरबंद वन्यप्राण्यांना कायमस्वरूपी जेरबंद ठेवण्याचा पायंडा महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पडलेला दिसतोय. पेंच व्याघ्रप्रकल्पातील खुल्या पिंजऱ्यातील वाघाना वन्यजीवप्रेमींच्या आग्रहाखातर जंगलात सोडण्याचा प्रयोग झाला. शासन, प्रशासनाच्या नकारात्मक मानसिकतेमुळे तो फसला. यवतमाळ जिल्ह्य़ातीलच पांढरकवडा येथील ठार केलेल्या वाघिणीच्या बछडय़ाला पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या खुल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. पण, अजूनही त्याच्या सुटके ची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.