मनीषनगर रेल्वे फाटक एक तास बंद; रस्ता वाहतूक खोळंबल्याने सर्वसामान्यांना त्रास

नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी मंगळवारी मनीषनगर रेल्वे फाटकाजवळ रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा यंत्रणांनी तो प्रयत्न हाणून पाडला. सुमारे दोनशे ते अडीचशे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. या आंदोलनामुळे एक तास रेल्वे फाटक बंद ठेवण्यात आल्याने मनीषनगर, बेसा, बेलतरोडी भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य समितीने रेल्वे रोको आंदोलनाची हाक दिली होती. समितीचे विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणांहून कार्यकर्ते गोळा झाले होते. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगजवळच्या एका मैदानात चारचाकी वाहनातून कार्यकर्ते सकाळी ११ वाजतापासून येत होते.  जेवण झाल्यानंतर दुपारी दीड वाजता वामनराव चटप, राम नेवले, महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, उषा लांबट, ज्योती खांडेकर, माधुरी चव्हाण, रेखा निमजे, प्रणाली तवाणे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, राजेंद्र आगरकर, अरुण केदार यांच्या नेतृत्वात ‘जय विदर्भ’ अशी घोषणा देत कार्यकर्ते निघाले. त्यांच्या हातात स्वतंत्र विदर्भाचे झेंडे होते. आंदोलनात महिला आणि युवक-युवतींचाही सहभाग होता. सुमारे चारशे ते पाचशे आंदोलकांनी दोन मिनिटात मनीषनगर रेल्वे फाटक गाठले. मात्र  लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलीस आणि दंगल नियंत्रण पोलीस मोठय़ा प्रमाणात रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला तैन्यात करण्यात आले होते. याशिवाय साध्या वेशात पोलीस सकाळापासून मनीषनगर फाटक आणि सुमारे पाच किलोमीरटच्या परिसरात पाळत ठेवून होते. आंदोलक निघताच दोन्ही बाजूचे फाटक बंद करण्यात आले. त्या फाटकापासून काही अंतरावर सुरक्षा कठडे लावून लाठीसह पोलीस तैनात होते. पोलिसांनी आंदोलकांना फाटकापासून काही अंतरावर अडवले. आंदोलक विदर्भातील ११ जिल्ह्य़ांचा नकाशा असलेले झेंडा घेऊन जय विदर्भाचा गजर करीत होते. तसेच ‘वेगळा विदर्भ झाला पाहिजे..’, ‘विदर्भ आमच्या हक्काचा नाही कोणच्या बापचा..’ अशा घोषणा देत होते. पोलिसांनी अडवल्यावरही घोषणा सुरू होत्या. त्यानंतर काही आंदोलकांनी रस्त्यावर बसण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पोलिसांनी मज्जाव केला. काही महिला रस्त्याच्या बाजूला बसल्या. त्यांनाही उठवण्यात आले. पोलिसांनी कठडे ओलांडण्याच्या प्रयत्न करणाऱ्याला चोपले आणि तेथून त्याला बाहेर काढले. त्यानंतर एकेक नेत्यांना पकडून पोलीस वाहनात बसवण्यात आले. काहींना बळजबरीने वाहनात कोंबण्यात आले. त्यामुळे आंदोलनाची धार कमी होत गेली. हा प्रकार साधारणत : तासभर सुरू होता. पोलिसांनी सहा ते सात वाहनांमधून आंदोलकांना ताब्यात घेतले. अखेर दुपारी २.३५ मिनिटांनी रेल्वे फाटक उघडण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक आंदोलकाला भोवळ

पोलिसांनी सुमारे अर्धा ते पाऊण तास आंदोलकांना घोषणा करू दिले. त्यानंतर त्यांनी सक्रिय कार्यकर्त्यांना वाहनात कोंबण्यास सुरुवात केली. असे करीत असताना एका ज्येष्ठ नागरिक आंदोलक पडले. भोवळ आली आणि पाणी द्या, असे पोलीस सांगत होते. नंतर त्यांना वाहनात बसवण्यात आले नाही. ते ज्या वाहनातून आंदोलनस्थळी आले. त्या वाहनाकडे त्यांना घेऊन गेले.