राखी चव्हाण

दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात नियोजित तारखेपेक्षा दहा दिवसाहूनही अधिक काळ मान्सूनने प्रतीक्षा करायला लावली आहे. भारतीय हवामान खात्याने दोन दिवसाआधी नागपूर, अकोला, अमरावती आदी शहरांसह विदर्भात मान्सूनची घोषणा केली. वाऱ्यांची दिशा मान्सूनचे निकष पूर्ण करणारी नाही. त्यामुळे मुंबई तसेच कोकणात अजूनही खात्याने मान्सूनची घोषणा केली नाही. मात्र, विदर्भातही परिस्थिती वेगळी नसताना मान्सूनचे निकष ओलांडून मान्सूनची घोषणा करण्यात आली. मान्सूनचे निकष ठरलेले असताना हवामान खात्याने मुंबई, कोंकण आणि विदर्भाच्या बाबतीत निकषांची विभागणी करण्यामागील कारण मात्र कळेनासे झाले आहे.

महाराष्ट्रात साधारणपणे दहा जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होते. २००९ साली अलनिनोमुळे मुंबईत मान्सूनचे आगमन लांबले होते आणि २७ जूनला मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर २०१६ मध्ये २० जूनला मान्सूनचे आगमन झाले. मात्र, २००९ नंतर सुमारे दशकभरानंतर पहिल्यांदाच मान्सूनला इतका उशीर झाला आहे. वायू चक्रीवादळाचा परिणाम झाल्यामुळे मुंबईत या वर्षी मान्सूनचे आगमन लांबले आहे. मुंबईत पावसाचे आगमन झाले असले तरीही वाऱ्यांची दिशा मान्सूनचे निकष पूर्ण करणारी नाही. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने मान्सून घोषित केला नाही. विदर्भात घाईघाईत मान्सून घोषित करण्याचे कारण मात्र अजूनही उमगलेले नाही. विदर्भातही वाऱ्यांची दिशा मान्सूनचे निकष पूर्ण करणारी नाही. सध्या पडणारा पाऊस हा गडगडाटी आहे.

वादळी व गडगडाटी पाऊस मान्सूनच्या निकषात नाही. विदर्भात वारे दिसत आहेत, पण वाऱ्यांची दिशा जूनअखेरीस मान्सूनचे संकेत देणारी आहे. तरीही विदर्भात मान्सून घोषित करण्यात आला. सर्वसामान्यांना या निकषांची जाण नसल्याने खात्याच्या या घोषणेवर त्यांचा लवकर विश्वास बसतो. मात्र, याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. मान्सूनच्या घोषणेवर विश्वास ठेवून तो देखील मशागतीला लागतो. पाऊसच मान्सूनचा नसल्याने काही कालावधीनंतर तो थांबतो आणि शेतकऱ्यांची मेहनत आणि पैसा दोन्हीही वाया जातात.

गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या स्थितीला हवामान खातेही तेवढेच जबाबदार आहे. खात्याच्या विरोधात पोलिसात तक्रारीदेखील करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतरही मान्सून घोषित करण्याबाबत खात्यात सुधारणा झालेल्या नाहीत. २०१७ सालीदेखील अशीच परिस्थिती होती. त्यावेळीही मुंबईत मान्सूनची स्थिती १९ जूननंतर दर्शवली असताना तत्पूर्वीच मान्सूनची घोषणा करण्यात आली होती.

पुण्याच्या बाबतही तेच केले होते. गडगडाटी पाऊस त्या ठिकाणी आला आणि मान्सूनची घोषणा खात्याने केली. केरळच्या बाबतीत मान्सूनचे निकष आणि इतर मापदंड तपासून नंतरच वाऱ्यांची दिशा समाधानकारक असेल तर मान्सून घोषित केला जातो. त्यामुळे केरळ सोडून इतर ठिकाणी मान्सून घोषित करण्यासाठी काहीच मापदंड नाहीत का? असा प्रश्न सहज निर्माण होतो. यावेळी खात्याने मुंबईतही हे मापदंड लावले आहेत. अजूनपर्यंत त्या ठिकाणीही मान्सून घोषित केला नाही, पण विदर्भातच्या बाबतीत हे मापदंड ओलांडून वादळी पावसावर मान्सून घोषित करण्यात आला. त्यामुळे मान्सून वाऱ्यांचा की वादळी पावसाचा? याबाबत भारतीय हवामान खात्याचे पश्चिम विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी वारंवार संपर्क साधला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मान्सून जाहीर करण्याचा एकसमान करार असायला हवा. कारण शेवटी शेतकऱ्यांवर याचा परिणाम होतो. मान्सून आल्याचे जाहीर करणे म्हणजे शेतकरी तयारीला लागतात आणि मग पाऊस थांबला की त्यांची मशागत, पेरणी सर्व वाया जाते. मान्सूनपूर्व पाऊस हा दुपारनंतर येतो. तो गडगडाटी असतो आणि तासाभरात तो ४०-५० मिलिमीटरदेखील पडू शकतो. मात्र, मान्सूनच्या पावसाची दिवसभरात अशी विशेष वेळ नसते आणि याबाबतीत ढगाळी वातावरण जवळपास दिवसभर असतं. विदर्भात मान्सून जाहीर करण्यात आला, पण २६ जूननंतर किमान एक आठवडा तरी या पावसात खंड पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मान्सून आला म्हणजे आता नियमित पाऊस पडणार, अशा बातम्यांनी गोंधळून जाऊ नये.

– अक्षय देवरस, हवामानतज्ज्ञ