आज जागतिक जलदिन

दरवर्षी पडणारा पाऊस जमिनीतील पाण्याची पातळी वाढवतो, पण हा वेग जितका आहे, किंबहुना त्याहून अधिक वेग जमिनीतील पाणी उपसण्याचा आहे. गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने कमी होणारी जमिनीतील पाण्याची पातळी कमी होण्यामागे हे एक मोठे कारण आहे. जमिनीत पाणी जिरणे आणि उपसण्याचे हे समीकरण असेच कायम राहिल्यास येत्या काही वर्षांत पाण्याची स्थिती याहूनही भयावह होण्याचे संकेत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिले आहेत.

केंद्रातील जलसंपदा मंत्रालयाने सुमारे दीड महिन्यापूर्वी ५ फेब्रुवारी २०१६ ला देशातील काही महत्त्वपूर्ण जलाशयातील जलसाठय़ांची आकडेवारी जाहीर केली. या आकडय़ांच्या माध्यमातून देशातील सुमारे ९१ जलाशयांची पाणी जलसाठय़ांच्या क्षमतेची स्थिती सांगितली आहे. त्यानुसार या जलाशयातील पाण्याची पातळी बरीच कमी झाली आहे. मुळातच या जलाशयांची निर्मिती पाणी साठवण्याच्या उद्देशाने झाली होती, पण ते पाणी साठवल्याच गेले नाही. सिंचन आणि पाणीप्रश्नाकडे झालेले कमालीचे दुर्लक्ष हे त्यामागील एक कारण आहे. पाणी साठवण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या जलाशयांची स्थिती अशी असेल तर नैसर्गिक जलाशयाची स्थिती काय असणार, याचा विचारही करू नये. सध्या गुजरात आणि महाराष्ट्रात २७.०७ बीएमसीची एकूण क्षमता असणारे २७ जलाशये आहेत आणि त्यातील एकूण उपलब्ध जलसाठा ९.१४ बीसीएम आहे. गेल्या वर्षी याच काळात या जलाशयात ५४ टक्के जलसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षांत जलसाठा कमी झाला आहे, पण गेल्या दहा वर्षांतील जलसाठय़ाच्या तुलनेतही हा जलसाठा कमी आहे.

महाराष्ट्रात पाऊस कमी पडला की, लगेच दुष्काळ परिस्थिती जाहीर केली जाते. यापेक्षाही कमी पाऊस इस्रायलमध्ये पडतो, पण तेथे कधी दुष्काळ पडत नाही. कमी पाऊस म्हणजे, दुष्काळ असे समीकरण आपण करून ठेवले आहे. इस्रायलचे शेती व्यवसायाचे व्यवस्थापन कौशल्य वापरले तर कमी पावसानंतरचा दुष्काळ टाळता येऊ शकतो. त्याच्याकडे कमी पाऊस जमिनीत मुरवण्याची क्षमता अधिक आहे आणि आपण जमिनीत जेवढे पाणी मुरवतो, त्यातून दुप्पट वेगाने पाणी उपसतो. गेल्या वर्षी देशभरात सरासरीपेक्षा सुमारे १३ टक्के पाऊस कमी पडला. मराठवाडय़ात तो ५० टक्क्यांपेक्षा कमी पडला आणि सप्टेंबरमध्येच पावसाळा संपला. पाण्याची साठवणूक अधिक आणि उपसा कमी केला तर कमी पावसानंतरही पाण्याची स्थिती चांगली राहू शकते.

‘हा सर्व तलावाच्या खोलीचा खेळ आहे’

जलाशयातील जलपातळी खालावण्याचे आणखी एक कारण म्हणजे, गणेश आणि देवी मूर्तीचे होणारे विसर्जन आहे. मातीच्या मूर्ती पाण्यात विरघळतात, हा एक गैरसमज आहे. या मूर्तीची माती तलावाच्या तळाशी जाऊन बसते आणि त्यामुळे तलावाची खोली कमी होते. त्यामुळे पाऊस पडतो तेव्हा आपल्याला ही जलाशये तुडूंब भरलेली दिसतात आणि उन्हाळा सुरू होताच ती कोरडी झालेली दिसतात. हा सर्व तलावाच्या खोलीचा खेळ आहे. जलाशयाच्या आजूबाजूने खचणारी माती यामुळेसुद्धा तलावाची खोली कमी होत आहे. तलावातील हा मातीचा मलबा काढून तो शेतीसाठी उपयोगी पडत असल्याने शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांची जमीनही सुपीक होईल आणि जलाशयाची खोली वाढेल, पण महाराष्ट्रात या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाल्याने पाणी शिल्लक राहात नाही.

-कौस्तुव चटर्जी, ग्रिन विजिल संस्था