जंगलात गस्त घालताना वन कर्मचारी, वनरक्षक यांना अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. गस्तीसाठी असणारी चारचाकी वाहने जंगलातल्या गस्तीच्या प्रत्येक वळणावर पोहोचतीलच असे नाही, अशावेळी त्यांना पायदळ गस्तीचा पर्याय स्वीकारावा लागतो. जखमी वन्यप्राण्यांच्या मदतीतदेखील अडचणी येतात. यावेळी हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची शक्यताही नाकारता येत नाही. या अनेक अडचणींवर मात करण्यासाठी वन खात्याच्या ताफ्यात अभिनव ‘रेस्क्यू बाईक्स’ दाखल झाल्या आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते या बाईक्सच्या चाव्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
जखमी वन्यप्राण्यांना घटनास्थळावरून आणताना आणि गस्तीदरम्यान वन कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वाघ, बिबट यासारख्या हिस्त्र वन्यप्राण्यांचा वावर आसपास असल्यास वन कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका होतो. जंगलात जखमी वन्यप्राण्याला सुरक्षित सोडवताना क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांसमोर अनेक आव्हाने असतात. अशा परिस्थितीत वनरक्षकाबरोबरच वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक असते. हे लक्षात घेऊनच ‘माय व्हेट’ या चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मधुरिता गुप्ता यांनी रेस्क्यू बाईक्सची संकल्पना मांडली आणि सुरुवातीला दोन बाईक्सची निर्मिती केली. या बाईक्स वनखात्याच्या सुपूर्द करताना वनखात्याचे सचिव विकास खारगे, ‘माय व्हेट’ चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मधुरिता गुप्ता, आमदार सुरेश धोटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या रेस्क्यू बाईक्समुळे मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षांदरम्यानची परिस्थिती हाताळण्यास मदत होणार आहे. जंगलात गस्त घालण्याबरोबरच वेगवेगळया परिस्थितीत या बाईक्सचा उपयोग करता येईल.
दोन आसनी बाईक्सचा वापर अडचणीततील वन्यप्राण्यांच्या जवळ जाऊन मदत करण्यासाठी, त्याला बधिर किंवा बेशुद्ध करण्यासाठी करता येईल. वन्यप्राण्यांचे सर्वेक्षण तसेच संनियंत्रण करण्यासाठी, राष्ट्रीय उद्यान तसेच अभयारण्य किंवा वन्यजीवांची संख्या अधिक असणाऱ्या क्षेत्रात या बाईक्सचा खूप चांगल्याप्रकारे उपयोग होईल.

सुसज्ज ‘बाईक’
३६० अंशामध्ये निरीक्षण करता येईल अशा पद्धतीने ही बाईक तयार करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून बचाव होण्यासाठी सर्व बाजूंनी लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे. त्याचवेळी बाईकचे संतुलन बिघडणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. बाईकला चारही बाजूने एलईडी दिव्यांची व्यवस्था असल्यामुळे गस्त घालताना चारही दिशेने लक्ष ठेवता येणार आहे. या बाईक्समध्ये डार्टगन, पाण्याची बाटली, औषधाचे किट, ब्लो पाईप, दोरखंड ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.