पुलगाव दारूगोळा भांडार अग्निकांड
पुलगाव दारूगोळा भांडारातील दुर्घटनेने सारेच व्यथित झालेले असताना मृत व जखमींना अर्थसाह्य़ देण्याच्या प्रकाराचा गवगवा व प्रसिद्धी करण्याच्या राज्य शासनाच्या कृतीमुळे आज पीडितांच्या कुटुंबीयांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
पुलगाव घटनेतील मृत व जखमींच्या कुटुंबांना अनुक्रमे प्रत्येकी ५ लाख व १ लाख रुपयांची मदत राज्य शासनाने जाहीर केली होती. ही मदत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या कुटुंबांना मिळणे अपेक्षित होते. वर्धा प्रशासनाने तशी तयारीही केली होती, मात्र शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मदतीचे धनादेश वाटप करणार, असे जाहीर झाले आणि मदत वाटपाच्या या प्रसिद्धीचे तंत्र बघून अनेकांना धक्काच बसला. पीडितांच्या कुटुंबांशी मुख्यमंत्री बोलणार, हे ठरल्यावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता या कुटुंबीयांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले. या आगीत जखमी झालेले जवान वध्र्यापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंगी मेघे रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना रुग्णांना सोडून जिल्हाधिकारी कार्यालय गाठावे लागले.
या दुर्घटनेत शहीद झालेले तीन जवान महाराष्ट्रातील आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात आणण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री शहीद जवान अमित दांडेकरच्या पत्नी प्राचीशी बोलले. या वेळी उपस्थित असलेले जखमी जवानांचे १३ नातेवाईक बोलण्याच्या मन:स्थितीतही नव्हते. या सर्वाना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरू असताना मदतीचे धनादेश देण्यात आले. या मदतीचे चित्रीकरण करण्यासाठी तर हा कार्यक्रम आयोजित केला नव्हता ना, अशी शंका या वेळी अनेकांच्या मनात आली. प्रत्यक्षात लष्कराच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या मृत व जखमी जवानांच्या यादीत त्यांचा बँक खाते क्रमांकसुद्धा देण्यात आला होता. त्या खात्यात रक्कम परस्पर जमा करता आली असती, पण केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हा कार्यक्रम आयोजिण्यात आला, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या संदर्भात वर्धा प्रशासनाकडे विचारणा केली असता दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री येऊ शकले नव्हते. त्यांना पीडित कुटुंबांशी बोलायचे होते म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात कुठेही प्रसिद्धीचा उद्देश नव्हता, असे स्पष्ट करण्यात आले.