सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची खंत

नागपूर : आपण करीत असलेल्या कार्यात निस्पृह असणे हा सर्वात मोठा सद्गुण असतो. श्री.भा. वर्णेकर जेवढे मोठे होते तितकीच त्यांच्यात निस्पृहता देखील होती. त्यामुळेच त्यांचे कार्य व्यक्तित्व श्रेष्ठ ठरते. अन्यथा हल्ली विद्वानांमधील निस्पृहता लोप पावत चालली आहे, अशी खंत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली. दिवं. श्री.भा. वर्णेकर जन्मशताब्दी सोहळ्याच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.

मुंडले सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर स्वामी गोविंददेवगिरी महाराज, चंद्रगुप्त वर्णेकर आणि अरविंद मार्डीकर उपस्थित होते. सरसंघचालक म्हणाले, व्यक्ती समाजात वावरताना प्रत्येकाला त्यांच्यात वेगवेगळ्या छटा दिसतात. परंतु, एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या अवतिभोवती वावरणाऱ्या सर्वानाच ते सारखे वाटावे यातच त्या व्यक्तिमत्त्वाची थोरवी असते. स्व. वर्णेकर हे असेच व्यक्तिमत्त्व होते. स्व. वर्णेकर यांच्या साहित्याचा विचार केला असता ज्ञान, भक्ती आणि देशप्रेम हा त्यांच्या साहित्याचा स्थायीभाव होता. शृंगाराऐवजी त्यांनी समाजप्रबोधनाला प्राधान्य दिले. वर्णेकरांची भारतरत्नासाठी निवड झाली असती तर त्यांनी ती देखील नाकारली असती इतकी निस्पृहता त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. यावेळी डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते स्व. श्री. भा. वर्णेकर रचित ‘प्रज्ञाभारतीयम्’ या ग्रंथाच्या नूतन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. संचालन अरविंद मार्डीकर यांनी केले.

वर्णेकरांच्या आचरणात गीता होती

वर्णेकरांच्या कार्य, कर्तृत्व आणि जीवनावर बोलण्यासाठी कितीही शब्द आणि वेळ खर्ची घातला तरी तो कमी पडेल. कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता वर्णेकर आपल्या आयुष्यात जगले, असे स्वामी गोविंददेवगिरी यांनी सांगितले.