News Flash

‘क्रेझी केसल’मध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर!

शहरातील  एकमेव ‘वॉटर पार्क’ असल्याने येथे मुले आणि युवकांची मोठी गर्दी असते.

अग्निशामन विभागाच्या पाहणीत उघड

अंबाझरी तलावाजवळील क्रेझी केसल या वॉटर पार्कमध्ये जलतरण तलावात पोहणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नाही. कुणी बुडत असेल तर त्याला वाचवण्यासाठी एकही ‘लाईफ जॅकेट’, लोखंडी साखळी, तलावातील धोकादायक स्थळावर नागरिकांना र्निबध घालणारे सुरक्षा कवच, बांबू उपलब्ध नाही, असे अग्निशमन विभागाने पाहणीत निदर्शनास आले आहे.

शहरातील  एकमेव ‘वॉटर पार्क’ असल्याने येथे मुले आणि युवकांची मोठी गर्दी असते. कृत्रिमरित्या पाण्याच्या लाटा तयार होणाऱ्या तलावाचे सर्वाना आकर्षण आहे. येथे आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची जबाबदारी पार्कच्या मालकाची आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रविवारची दुर्घटना घडल्याचे दिसून येते. तरुण बुडत असताना वेळीच त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही. दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाने क्रेझी केसलमधील सुरक्षा उपायोजनेची पाहणी केली.  कृत्रिम लाटा निर्माण करणाऱ्या तलावाच्या टोकाची लांबी साडेपाच ते सहा फूट असतानाही तेथे बुडण्यापासून वाचवण्यासाठी एकही लाईफ जॅकेट, हवा भरलेले टय़ूब, बांबू, लोखंडी साखळी,पाण्यातून बाहेर काढण्यासाठी दोरी नसल्याचे पाहणीत आढळून आले. तलावातील खोल पाण्यात  जायला र्निबध घलण्यासाठीही येथे लोखंडी साखळीही लावण्यात आली नव्हती. अग्निशामन  विभागाने यापूर्वीही पार्क व्यवस्थापनाला  सुरक्षा उपाययोजनेबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांनी त्याकडे  दुर्लक्ष केले. बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी पाच सुरक्षा जवान तैनात केले होते, असे  क्रेझी केसलकडून अग्निशामन दलाला सांगण्यात आले,परंतु तलावातील ४०० ते ५०० जणांची संख्या बघता ही संख्या कमी आहे. दरम्यान, तलावात एकाच वेळी किती तरुण उतरावे याबाबतही निश्चित नियम नाहीत. दुर्घटना घडल्यास तातडीने रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था नाही, रविवारी अत्यवस्थ तरुणांना त्यांच्या नातेवाईकांडे सोपवून कर्मचारी मोकळे झाले होते.

पोलिसांचा दावा खोटा

क्रेझी केसलमध्ये रविवारी मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांचे शवविच्छेदन सोमवारी मेडिकलमध्ये करण्यात आले. प्राथमिक अहवालात या तरुणांचा मृत्यू बुडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांनी मद्य प्राशन केले नव्हते. या तरुणांनी मद्य प्राशन केल्याचा दावा क्रेझी केसल आणि पोलिसानी रविवारी केला होता. तो खोटा ठरला आहे.

आवश्यक सुरक्षारक्षक होते

कृत्रिम लाटा तयार करणाऱ्या जलतरण तलावाची खोली कमी राहते. त्यामुळे येथे  बुडण्याची शक्यता नसते. त्यामुळे वॉटर पार्क मध्ये हवा भरलेले टय़ूब, लाईफ जॅकेट, बांबू, बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी दोऱ्या व इतर सुरक्षेसंबंधीत साहित्याची गरज नसते. बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी येथे आवश्यक सुरक्षा जवान तैनात होते. तरुणांना वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न झाले. तरुणांना रुग्णालयात पाठवण्यासाठी टॅक्सी मागवली असती तर वेळ गेला असता म्हणून मिळेल त्या साधनाने रुग्णालयात जाण्याचा सल्ला नातेवाईकांना देण्यात आला.

गौतम रॉय, व्यवस्थापक, क्रेझी केसल, नागपूर.

पोलिसांनी अहवाल मागितल्यास मदत करणार

अग्निशमन दलाला क्रेझी केसलमध्ये केलेल्या पहाणीत तलावात पोहणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली अनेक साधने नसल्याचे आढळले. अग्निशमन दलाला थेट कारवाईचे अधिकार नाही, परंतु पोलिसांनी अग्निशमन दलाला माहिती मागितल्यास त्यांना मदत केली जाईल.

राजेंद्र उचके, मुख्य अग्निशामन अधिकारी, नागपूर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2018 2:53 am

Web Title: safety issue in crazy castle nagpur
Next Stories
1 इंजिनिअर मित्रांचा ‘देशी बारबेक्यू’!
2 आठ वर्षांच्या मुलीवर दहावीतील मुलाचा बलात्कार
3 .. तर काँग्रेस आमदारांचे अपहरण झाले असते!
Just Now!
X