पुढील महिन्यात अहवाल अपेक्षित

राजेश्वर ठाकरे, नागपूर</strong>

केंद्र सरकारच्या नागरी हवाई वाहतूक खात्याने ‘सी-प्लेन’ सुरू करण्यासाठी रामटेकजवळील खिंडसी तलाव आणि चंद्रपूर नजीकच्या इरई धरणाची निवड केली आहे. या दोन्ही स्थळांचा सव्‍‌र्हे अंतिम टप्प्यात आहे. मात्र, बहुचर्चित अंबाझरी आणि कोराडी तलावाचा यासाठी विचार झालेला नाही.

विदर्भातील विविध तलाव आणि धरणांची पाहणी केल्यानंतर ‘उडान ३.०’ या योजनेअंतर्गत खिंडसी तलाव आणि इरई धरणाची निवड करण्यात आली. या योजनेसाठी केंद्र सरकारचे नागरी वाहतूक खाते, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) यांच्यात करार झाला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे या दोन्ही स्थळांचा सव्‍‌र्हे सुरू आहे. एएआय यांच्याकडून सी-प्लेनसाठी ‘स्पेसिफिकेशन’ मिळणार आहे. यासंदर्भातील सूचना पुढील महिन्यात येणे अपेक्षित आहे. त्यानंतर आणखी एका तांत्रिक बाबीविषयीचा अभ्यास केला जाणार आहे. या सर्वाचा एकत्रित अहवाल आणि मार्गदर्शक सूचना एमएडीसीला प्राप्त होतील. त्यानंतर एमएडीसी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करेल, असे सूत्रांनी सांगितले.  दरम्यान, नागपुरातील अंबाझरी आणि कोराडी तलाव येथून सी-प्लेन सुरू होण्याची शक्यता दिसत नाही. केंद्र सरकारच्या पथकाने या दोन्ही ठिकाणांचा विचार केलेला  नाही. सी-प्लेनसाठी राज्य सरकार ८० टक्के आणि नागपूर सुधार प्रन्यास २० टक्के निधी देणार होते. सी-प्लेन सुरू करून विदर्भातील पर्यटन विकासाला चालना देण्याचा प्रयत्न आहे.  खिंडसी तलावातून सी-प्लेन उडवून कोराडी तलावात आणि कोराडी तलावातून अंबाझरी तलावात सी-प्लेन उतरवण्याची योजना राज्य सरकारची होती. केंद्राने नकार दिल्याने तूर्तास ही योजना बारगळली आहे.

अंबाझरी, कोराडीला वगळले

अंबाझरी, खिंडसी आणि कोराडी तलावाला जोडणारे सी-प्लेन पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता. परंतु कोराडी तलावाजवळ औष्णिक वीज प्रकल्पाचे धुरांडे आहे  तर अंबाझरी अगदी शहराशेजारी आहे. त्यामुळे या दोन्ही स्थळांना विचार झालेला नाही.

‘‘केंद्र सरकारने दोन स्थळांची निवड केली आहे. सी-प्लेन ही नवीन संकल्पना आहे. यासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सूचना मागवल्या आहेत. त्या प्राप्त झाल्यानंतर पुढच्या कामाला एमएडीसी सुरुवात करेल. ’’

– सुरेश काकाणी, व्यवस्थापकीय संचालक, एमएडीसी.