मेडिकलच्या डॉक्टरसह चार नवीन संशयित दाखल

नागपूर :  मेडिकलच्या एका डॉक्टरसह विदेशात प्रवासाचा इतिहास असलेल्या चार नवीन संशयित रुग्णांना आज गुरूवारी दाखल करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. दुसरीकडे मेडिकलमध्ये दाखल तीन करोना बाधितांपैकी दोघांचा दुसरा तपासणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आला असून वृत्त लिहिस्तोवर तिसऱ्याचा अहवाल यायचा होता. दोन रुग्णांमध्येही तूर्तास हे विषाणू दिसत असले तरी त्यांच्या तिसऱ्या अहवालाकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

मेयोतील रुग्णाचा दुसरा तपासणी अहवाल बुधवारी ‘निगेटिव्ह’ आल्याचे लोकसत्ताने पुढे आणले होते. त्यानंतर गुरूवारी मेडिकलमधील तिघांपैकी दोन पूर्वी ‘पॉझिटिव्ह’ असलेल्या रुग्णांचाही अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे.  दोन ‘निगेटिव्ह’ रुग्णांची काही दिवसांत तिसरी तपासणी होणार असून त्यानंतर के ंद्र व राज्य शासनच्या आरोग्य मंत्रालयातील तज्ज्ञांसह आयसीएमआरच्या सूचनेनुसार या रुग्णांच्या उपचाराची पुढची दिशा ठरेल. दरम्यान, चारपैकी आतापर्यंत तीन रुग्णांचे दुसरे नमुने ‘निगेटिव्ह’ आल्याने शासकीय रुग्णालय असलेल्या मेडिकल, मेयोतील उरचारावर सामान्य नागरिकांचा विश्वास वाढण्यास मदत होणार आहे. त्यातच गुरुवारी मेडिकलच्या बालरोग विभागातील अधिव्याख्याता दर्जाच्या ३७ वर्षीय डॉक्टरसह २४ वर्षीय जर्मनीहून परतलेल्या पश्चिम नागपूरच्या एका तरुणालाही मेडिकलला दाखल के ले गेले.

या दोघांनाही सर्दी, खोकला, ताप होता. त्यांचे नमुने तपासणीसाठी  पाठवण्यात आले. दरम्यान, विदेशातून आलेल्या दोन संशयितांना मेयोत दाखल करण्यात आले आहे.

करोनाग्रस्ताची मदत करणारा डॉक्टर संशयित

मेडिकलच्या विशेष वार्डात करोना विषाणूने ग्रस्त ३ रुग्णांना ठेवण्यात आले आहे. यापैकी एकाला  भोवळ आल्याने तो खाली पडला.  बालरोग विभागातील  अधिव्याख्यात्याने मदतीसाठी धाव घेतली. आता त्याच्यातच सर्दी, खोकल्यासह इतर लक्षणे आढळल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.