सकाळी उद्यानात फेरफटका मारून दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून सक्करदरा उद्यानात फिरायला येणाऱ्यांना शांतता आणि शुद्ध हवा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या या उद्यानात झोपडय़ा वसवण्यात आल्या असून त्यातून निघणारा धूर आणि झोपडवासीयांची रेलचेल उद्यानात फिरायला येणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
नागपूर सुधार प्रन्यासच्या देखभाल दुरुस्तीअभावी सक्करदरा उद्यान अत्यंत दयनीय अवस्थेत तर आहेच, पण कंत्राटदाराच्या कृपेने येथे झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत. उद्यानाच्या पश्चिमेला पाच ते सहा झोपडय़ा आहेत. शिवाय संरक्षण भिंतीला लागून एक पक्के घर बांधण्यात आले आहे. येथील नागरिकांना उद्यानातील पाणी, वीज वापरण्याची मुभा आहे. स्नानगृह आणि शौचालयही वापरण्यात येत आहे. येथील पुरुष मंडळी उघडय़ावर आंघोळ करीत असतात. दुसरीकडे झोपडय़ांमधून शेगडय़ांच्या धूर बाहेर पडत असतो. यामुळे ट्रॅकवरून चकरा मारणाऱ्यांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.
उद्यानात शांतता आणि स्वच्छ हवा असणे अपेक्षित आहे. त्यासाठीच नागरिक फिरण्यासाठी पैसे मोजून उद्यानात येतात, परंतु देखभाल दुरुस्तीचे कंत्राट असलेल्या व्यक्तीने येथे कामगारांना झोपडय़ा बांधण्यास परवानगी दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या झोपडय़ा येथे असल्याचे उद्यानात नियमित फिरायला येणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांकडून शुल्क आकारण्यात येते. सकाळी एक तास फिरण्यासाठी महिन्याला २५० रुपये आकारण्यात येते. त्या मोबदल्यात उद्यानाची देखभाल दुरुस्ती आणि उद्यानात शांतता, स्वच्छता ठेवणे अपेक्षित आहे. मात्र येथील कंत्राटदार आपल्या इतर कामासाठी आणलेल्या मजुरांना येथे आश्रय देऊन उद्यानाची शांतता भंग करण्याचे काम करीत आहे. या झोपडय़ा कंत्राटादाराच्या मजुरांच्या आहेत, असे नगरसेवक दीपक कापसे यांनी सांगितले.
नागपूर सुधार प्रन्यासचे सक्करदरा तलाव्याच्या शेजारी उद्यान असून देखभाल दुरुस्ती आणि त्या उद्यानाच्या संचालनासाठी कंत्राट नेमण्यात आले आहे. गेल्या वर्षांपासून येथील उपाहारगृह बंद आहे. येथे सध्या उंट, घोडय़ाची सवारी उपलब्ध असून मिनी ट्रेनची सुविधा आहे. उद्यानातील खेळण्यांची तसेच उद्यानाची देखभाल दुरुस्ती योग्य होत नाही. ‘वॉकिंग ट्रॅक’वर चिखल आणि गवत असून काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. एवढेच नव्हेतर काही खेळणे नादुरुस्त असल्याने बालकांसाठी धोकादायक झाले आहेत. याकडे लक्ष न देणारा कंत्राटदार प्रतिव्यक्ती दहा रुपये प्रवेश शुल्क आणि उद्यानातील इतर साहित्य वापरण्याचे वेगळे शुल्क आकारत आहे.
उद्यानातील देशभाल दुरुस्तीकडे लक्ष तर नाहीच पण कंत्राटदाराची एकाधिकारशाही निर्माण झाल्याप्रमाणे येथे चार ते पाच अस्थायी झोपडय़ा उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
याशिवाय उद्यानाच्या संरक्षण भिंतीला लागून पक्के बांधकाम देखील करण्यात आले आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात या प्रभागाचे नगरसेवक संजय महाकाळकर यांच्याशी संपर्क साधला असता नासुप्रच्या या उद्यानाची देखभाल दुरुस्ती कंत्राटदाराकडे असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून उद्यानात जाणे झाले नसल्याने किती झोपडय़ा आहेत, याबद्दल कल्पना नसल्याचे ते म्हणाले.