जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा विश्वास

राज्यातील सरकार अल्पमतात यावे, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पाण्यात देव बुडवून बसले आहेत. मात्र सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार नाही आणि पूर्ण पाच वर्षे सरकार चालेल, असे मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त येथे आल्यावर ते माध्यमांशी बोलत होते.

राज्यात शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले असले आणि निवडणुकीच्या वेळी आरोप-प्रत्यारोप झाले असले तरी मुंबईसह राज्यात निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. सरकार अल्पमतात यावे, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र सरकार पडणार नाही आणि अल्पमतातही येणार नाही. पूर्ण पाच वर्षे सरकार चालेल. निवडणुकीनंतर मुंबईसह राज्यात युती करण्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घेतील. शिवसेनेसोबत युती करायची की नाही, याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असतानाही भाजपला चांगले यश मिळाले. नाशिकचा विकास भाजप करू शकतो, असा विश्वास लोकांमध्ये असल्यामुळेच जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. पक्षातील ज्या बंडखोरांनी पक्षविरोधात काम केले आहे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासंदर्भातील निर्णय प्रदेश पातळीवर घेतला जाईल. मात्र अशा बंडखोरांना पक्षात स्थान दिले जाणार नाही. जळगावमध्ये बालकवींच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारला प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी निधीची मागणी करण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.

अजित पवारांवर टीका

राज्यात आघाडीचे सरकार असताना जलसंपदा खाते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे होते. सुमारे १५ वर्षे ते या विभागाचे मंत्री असताना या खात्याची व्याप्ती किती मोठी होती, हे लक्षात आले नाही, अशी टीका करून गिरीश महाजन यांनी पवार यांचे नाव न घेता खात्यात बरेच काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. भाजपची राज्यात सत्ता आल्यावर माझ्याकडे हे खाते आल्यामुळे या कामात पारदर्शकता ठेवत या खात्याचा अभ्यास करून राज्यातील गोरगरिबांना व शेतकऱ्यांना त्याचा कसा लाभ देता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे महाजन यांनी सांगितले.