दहा दिवसात दोनदा नागपूर भेट

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दहा दिवसात दोनदा संघ मुख्यालयात लावलेली हजेरी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे,  आपण उज्जन कुंभमेळ्याचे निमंत्रण देण्यासाठी नागपूरला आलो, असे चौहान म्हणत असले तरी त्यांच्या राज्यात संघटनात्मक पातळीवर सर्व काही सुरळीत नसल्यानेच त्यांनी संघाची मदत घेणे पसंत केल्याची माहिती आहे.

गत आठडय़ात ३ एप्रिलला त्यांनी नागपूरला संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांनी ४० मिनिटे चर्चा केली होती. बंदव्दार चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी पत्रकारांशी बोलताना चौहान  यांनी आपण उज्जन कुंभ मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी आलो होतो, असे सांगितले होते. भाजपचे वरिष्ठ नेते नेहमीच संघ मुख्यालयाला भेट देऊन तेथील उच्चपदस्थांशी चर्चा करतात. केंद्रात सत्ता आल्यावर हे प्रमाण वाढले आहे. याच मालिकेतील चौहान यांची ही भेट असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, त्यानंतर पुन्हा आठच दिवसांनी म्हणजे, आज, १२ एप्रिलला चौहान पुन्हा संघ मुख्यालयी दाखल झाले. यावेळी त्यांनी संघातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे नेते सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्याशी तब्बल १ तास १० मिनिटे चर्चा केली. तेथून  बाहेर पडल्यावर त्यांनी पत्रकारांना यावेळी मध्यप्रदेशातील गो-अभयारण्याचे कारण दिले. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी जोशी यांना निमंत्रण देण्यासाठी आल्याचे स्पष्ट केले. मात्र, आता राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.