प्रत्येक पोलीस ठाण्यात १०-२० जण करोनाने ग्रस्त

मंगेश राऊत, लोकसत्ता

नागपूर : उपराजधानीतील करोनाचा प्रादुर्भाव थांबण्याची चिन्हे नसून याचा सर्वाधिक फटका शहर पोलीस दलाला बसला आहे. शहरातील पोलीस दलात ८०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून त्यात प्रत्येक पोलीस ठाण्यातील १० ते २०  कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही विलगीकरणात राहावे लागत असल्याने पोलीस ठाण्यात सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा पोलीस निरीक्षकांना जाणवत असून त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान नवीन पोलीस आयुक्तांसमोर असणार आहे.

सध्या देशभरात  सणांचा हंगाम आहे. या काळात लोकांचा एकमेकांशी सर्वाधिक संपर्क येतो. पण, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या काळात पोलिसांनाही सर्वाधिक बंदोबस्त असतो. शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे, घडलेल्या गुन्ह्य़ांचा तपास करणे आणि लोकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त करणे अशा विविध पातळ्यांवर पोलिसांना लढावे लागते. याकरिता निरोगी मनुष्यबळाची आवश्यकता असते. पण, सध्या शहर पोलीस दलाला करोनाचा विळखा अधिकच घट्ट होत आहे. शहर पोलीस दलातील ८०० वर अधिकारी व कर्मचारी करोनाग्रस्त आहेत. त्यातील काही बरे झालेत.

काहीजण अद्यापही उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले करोना चाचणी करीत असून स्वत:ला गृहविलगीकरणात ठेवत आहेत.  आजच्या परिस्थितीत प्रत्येक पोलीस ठाण्यात १० ते २० कर्मचारी व अधिकारी करोनाग्रस्त असून ते गृहविलगीकणात किंवा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या

संपर्कात आलेले अनेकजण गृहविलगीकरणात असून काहीजण करोनाच्या भीतीने रजेवर जात आहेत. या परिस्थितीत प्रत्येक पोलीस ठाण्यात काम करणाऱ्यांची संख्या निम्म्यावर आली आहे.

या परिस्थितीत पोलीस ठाण्याचा गाडा सुरळीतपणे हाकण्याचे मोठे आव्हान ठाणेदारांवर आहे. मनुष्यबळाचा अभाव असल्याने काम कसे करावे, असा प्रश्न प्रत्येक ठाणेदारांसमोर असून यातून शहर पोलीस दलाला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर असणार आहे.

अनेकजण सुटीवर जाण्याच्या प्रयत्नात

पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. करोनामुळे गुरुवारी सहावा कर्मचारी दगावला. त्यामुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनात करोनाची धडकी भरली आहे. कुणीही बाहेर जाऊन नोकरी करण्याच्या मानसिकतेत नाही. अनेकजण सुटी मागत आहेत. सर्व सुटीवर गेले तर पोलीस ठाण्यात काम कोण करणार, याचा विचार करण्यात येत आहे. एका पोलीस उपायुक्तांनी याबाबत शक्कल लढवली असून सुटीवर जाण्यापूर्वी पोलिसांनी स्वत:ची करोना चाचणी करावी. करोनाचा अहवाल सकारात्मक येणाऱ्यांनाच सुटी देण्यात येईल, असे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

करोनामुळे पोलीस हवालदाराचा मृत्यू

शांतीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदाराचा करोनाने गुरुवारी मृत्यू झाला. आतापर्यंत ६ पोलीस शिपाई करोनाचे बळी ठरले आहेत.  प्रकाश पाटील (बाराखोली) असे मृत पोलीस हवालदाराचे नाव आहे. पाटील यांची अचानक प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची करोना चाचणी सकारात्मक आली. उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी ते माहिती कक्षात कार्यरत होते. पोलीस दलातील बाधितांची संख्या आता ८०० च्या वर गेली  आहे. यात पोलिसांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे.