आमगाव देवळी परिसरातील दुर्घटना

नागपूर : खेळण्याच्या अनुषंगानेमासे पकडण्याच्या उद्देशानेनाल्यात उतरलेल्या बहीण-भावाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमगाव देवळी परिसरात उघडकीस आली.अभी विलास राऊत (७) आणि आरुषी विलास राऊत (१०) दोन्ही रा. आमगाव देवळी असेमृतांची नावे आहेत. त्यांचे आई-वडील मजुरी करतात. त्यांना दोनच अपत्ये होती. शाळा बंद असल्याने नेहमीप्रमाणे मुले घरीचअसायची. रविवारी त्यांचे आई-वडील कामावर गेले असतानादुपारी ४ वाजता बहीण-भाऊ गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याकडे गेले. नाल्यात एका ठिकाणी पाणी साचले होते. त्यांच्या घरचा वडिलोपार्जित व्यवसाय मासे पकडण्याचा आहे.त्यामुळे त्यांना मासे पकडण्याची उत्सुकता होती. दोघाही बहीण-भावांनी कपडे व चप्पल नाल्याच्या काठावर काढून ठेवले व पाण्यात उतरले. नाल्यात गाळ व पाणीहीखोल होते. त्यात ते बुडाले.

सायंकाळी ६ वाजता घरी परतल्यानंतर आई-वडिलांना मुले दिसली नाहीत. त्यांनी गावात त्यांचा शोध घेतला. ते कुठेच दिसून आले नाहीत. रात्रभर चिंतेत घालवल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा गावकऱ्यांनी शोधमोहीम राबवली असता नाल्याच्या काठावर त्यांचे कपडे दिसले. याची पोलिसांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात पोलीस घटनास्थळी पोहोचले.

त्यानंतर गावातील काही पोहणारे तरुण नाल्यात उतरले व शोध घेतला असता मृतदेह सापडले. मृतदेह गाळात फसले होते. ते काढायला दुपारी १२.३० वाजले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.