उदरनिर्वाहासाठी केली जाणारी मासेमारी कधीकधी अन्य जीवांसाठी कशी घातक ठरू शकते, याचा प्रत्यय अलीकडच्या काळात येऊ लागला आहे. सुरुवातीला नागपूर आणि नंतर अमरावती येथे मासेमारांच्या जाळयात अडकून सापांचा मृत्यू होण्याच्या घटना गेल्या तीन वषार्ंपासून उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे मासेमारांच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपुरातील सोनेगाव तलावात गेल्या वर्षी मासेमाऱ्यांनी टाकलेल्या जाळ्यात सात ते आठ साप अडकले आणि त्यातील अध्र्याहून अधिक सापांचा मृत्यू झाला. तशीच स्थिती यावर्षी अमरावती जिल्ह्यातील छत्री तलावात उद्भवली आहे. वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील व त्यांचे सहकारी धनंजय भांबूरकर, सुरेश खांडेकर हे छत्री तलाव परिसरातील प्लॅस्टिक कचरा स्वच्छ करीत असताना त्यांना मासेमाऱ्यांनी काठावर ठेवलेल्या जाळयात तीन मोठे साप अडकलेले दिसले. पांदिवड जातीचे हे तिन्ही साप मृतावस्थेत होते. नाले, ओहाळ, नद्या व तलाव हा याचा अधिवास आहे आणि बेडूक हे याचे मुख्य खाद्य आहे. या बिनविषारी सापांपासून मानवाला धोका नसला तरीही मासेमाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या तीन सापांचा जीव गेला. अमरावती परिसरात पकडलेले साप या ठिकाणी आणून सोडले जातात. त्यामुळे आता सर्पमित्रांनाही या ठिकाणी साप सोडताना काळजीने आणि सर्पसंवर्धनाचा उद्देश ठेवूनच येथे साप सोडावे लागणार आहेत. मासेमारांचे बेवारस पडलेले जाळे सापांच्या जीवावर बेतत आहेत.
वन्यजीव अभ्यासकांनी या घटनेनंतर स्थानिक मासेमाऱ्यांची भेट घेतली व त्यांना या गोष्टीची कल्पना दिली. भविष्यात असे बेवारस जाळे या ठिकाणी ठेवले जाणार नाहीत आणि इतर प्राणी, पक्षी त्यात अडकणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. छत्री तलावात २०१३ मध्ये दोन पक्षी, २०१५ मध्ये दोन साप व एक पक्षी जाळयात अडकून मृत्युमुखी पडले होते. पोहरा तलावात २०१४ मध्ये दोन कासव जाळयात अडकून मृत पावले होते. छत्री तलाव व पोहरा मालखेड परिसरातील जैवविविधता समृद्ध असली तरीही अशा धोक्यांपासून या जैवविविधतेचे संरक्षण करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा वन्यजीव अभ्यासकांनी यावेळी व्यक्त केली.