कार्यकारिणी बैठकीसाठी सोनिया, राहुल, मनमोहन सिंग उपस्थित राहणार

नागपूर : महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे निमित्त साधून काँग्रेसने आज वर्धा जिल्ह्य़ातील सेवाग्राम येथे कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. तसेच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा आणि जाहीर सभेच्या आयोजनामुळे काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीच्या राजकीय रणसंग्रामास येथून प्रारंभ करणार हे स्पष्ट दिसते.

एकेकाळी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा इशारा येथूनच दिला होता. त्याच भूमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला सत्तेतून ‘चले जाव’चा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देतील असे दिसते. महात्मा गांधी यांचे १९३६ ते १९४२ या कालावधीत सेवाग्राम आश्रमात वास्तव्य होते. महात्मा गांधी यांची हत्या  झाल्यानंतर १९४८ला याच आश्रमात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा कार्यकारिणीची बैठक येथे होत आहे. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे निमित्त साधून गांधी पर्वाशी काँग्रेसला जोडण्याचा प्रयत्न म्हणूनही याकडे पाहता येईल. कार्यकारिणीच्या बैठकीला संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हजेरी लावत आहेत.

 राजघाटावर गांधींना अभिवादन

राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग हे दिल्लीत राजघाटवर  महात्मा गांधी यांना अभिवादन केल्यानंतर ते विमानाने सकाळी दहा वाजता नागपुरात पोहोचतील. त्यानंतर ते सेवाग्रामकडे रवाना झाल्यावर तेथे सव्वाअकरा ते साडेअकरा वाजता बापू कुटीचे दर्शन घेतील.  महादेव भवनात दुपारी साडेबारा वाजता कार्यकारिणीच्या बैठकीला प्रारंभ होईल. साधारणत: दोन तास ही बैठक चालणार आहे.कार्यकारिणी बैठकीनंतर राहुल गांधी वध्र्याकडे रवाना होतील. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुपारी पदयात्रेला प्रारंभ होईल. सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतर चालत राहुल गांधी सर्कस मैदानावर येतील. येथे दुपारी ४ वाजता जाहीर सभेला प्रारंभ होईल, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी  सांगितले.

आज सेवाग्राममध्ये..

* सकाळी सव्वाअकराला बापू कुटी आश्रमात आगमन

* दुपारी साडेबाराला महादेव भवनमध्ये कार्यकारिणी बैठक ’दुपारी पावणेतीनला वध्र्यातील महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन

* दुपारी ३ वाजता पदयात्रेला प्रारंभ (मार्ग- आंबेडकर पुतळा, इतरवारा चौक, पटेल चौक, अंबिका हॉटेल, बालाजी मंदिर, सोशालिस्ट चौक, इंदिरा मार्केट, वंजारी चौक, गजानन चौक आणि शेवटी सर्कस मैदान.).

* दुपारी ३.४५ वाजता- संकल्प सभा, सर्कस मैदान, रामनगर, जिल्हा वर्धा.

भाजपची पदयात्रा : भाजपने मंगळवारीच पदयात्रा आयोजित केली आहे.आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वातावरणनिर्मिती म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५० किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे. वर्धा येथे २ ऑक्टोबरला पदयात्रा आहे.