विद्यापीठाच्या परीक्षेमुळे विद्यार्थी प्रचंड तणावात

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांचा गोंधळ सुरूच आहे. आज सोमवारी झालेल्या परीक्षेमध्ये एम.ए.च्या विद्यार्थ्यांनी दुपारी १.३० वाजता परीक्षा अ‍ॅपवर लॉगिन केले असता ‘आता कुठलाही पेपर नाही’(नो एक्झाम शेडय़ुल नाऊ) असा संदेश आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकल्याचा अंदाज आहे. अंतिम वर्ष हे पुढील भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतानाही विद्यापीठाचा गोंधळ सुरूच असल्याने परीक्षार्थी तणावात आहेत.

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये रोज नवीन समस्या समोर येत आहेत. सकाळच्या सत्रातील काही परीक्षा सुरळीत झाल्यानंतर एम.ए.च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेनुसार १.३० वाजता लॉगिन करायला सुरुवात केली. मात्र, विद्यापीठाने या वेळेवर पेपरची नोंदच करून न ठेवल्याने ‘आता कुठलाही पेपर नाही’ असा संदेश विद्यार्थ्यांच्या भ्रमणध्वनीवर येत होता. शेवटी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मदत केंद्रावर संपर्क केला असता संपर्कच होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला परीक्षेचा विषय शोधायला सुरुवात केली असता यादीमध्ये त्यांच्या विषयाचा कुठलाही पेपर नव्हता. त्यामुळे पुन्हा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. या सर्व प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षाच देता आली नाही.

विद्यार्थ्यांनी त्यानंतरही विद्यापीठाशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता काही वेळाने विद्यार्थ्यांचे लॉगिन यशस्वी झाले. मात्र, यातीलही अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ न शकल्याची प्राथमिक माहिती आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांची विचारणा केला असता संपर्क होऊ शकला नाही.

पोकळ दावा

विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये रोज येणाऱ्या नवीन समस्यांमुळे विद्यार्थी आणि पालक तणावात आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पेपरच देता येत नाही, तर काही विद्यार्थ्यांनी पेपर दिला असता तो जमा होत नाही. विद्यापीठातर्फे रोज ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी यशस्वी परीक्षा दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, असे असले तरी पेपर दिल्यावर विद्यार्थ्यांना कुठलीही नोटिफीकेशन मिळत नसल्याने आपला पेपर खरच जमा झाला का, याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असते.