सुपरस्पेशालिटी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

शेतमजूर कुटुंबातील सहा वर्षीय मुलीने खेळता-खेळता केसाला लावण्याची पिन गिळली. बऱ्याच डॉक्टरांकडून उपचारानंतरही ती बाहेर निघाली नाही. त्रास वाढल्यावर मुलीला नागपूरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात आणण्यात आले. प्रा. डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करीत एन्डोस्कोपीने ही पिन बाहेर काढली. लोखंडी पिनचा ६० टक्के भाग गळल्यामुळे मुलीच्या आतडीला थोडी इजा झाली आहे, परंतु लवकरच ती बरी होण्याची डॉक्टरांना आशा आहे. पायल संजय धरणे (६) रा. खुटवंडा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर असे मुलीचे नाव आहे. तिचे वडील शेतमजूर तर आई गृहिणी आहे. चार महिन्यांपूर्वी पायलने ४ सेंटिमीटरची पिन तोंडात घातली. हे कळताच कुटुंबीयांनी रुग्णालय गाठले. गावातील डॉक्टरांनी एक्स-रे काढल्यावर मुलीला केळी खाऊ घालण्यासह इतरही काही सल्ले दिले. दोन-तीन दिवस हा प्रयत्न केल्यावरही पिन बाहेर निघाली नाही. मुलीच्या पोटात दुखणे सुरू झाल्यावर चंद्रपूरच्या रुग्णालयात नेले. तेथेही बऱ्याच तपासण्या झाल्या, परंतु पोटदुखी वाढतच होती. शेवटी काहींनी मुलीला नागपूरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार हे कुटुंब सुपरस्पेशालिटी रुग्णालयात आले. डॉ. सुधीर गुप्ता यांनी मुलीचा एक्स-रेसह एन्डोस्कोपी तपासणी केली असता पिन पोटातील लहान आतडीत असल्याचे समोर आले. लोखंडी पिन आतडय़ांमध्ये गळत असल्याने जखम झाली होती.

डॉक्टरांनी कुटुंबाच्या परवानगीने एन्डोस्कोपीने ही पिन काढण्याचे ठरवले. त्यानुसार गुरुवारी काही तास चाललेल्या प्रक्रियेनंतर ही पिन काढण्यात यश मिळाले. ही पिन सुमारे ६० टक्के गळून गेल्याचे बघत डॉक्टरही थक्क झाले. पिन योग्यपद्धतीने न निघाल्यास ती आतडय़ांमध्ये शिरून तेथे रक्तस्रावही शक्य होता, परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नाने पिन सुरक्षित निघाली.

मुलीला सुस्थितीत बघून मुलीच्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. ही शस्त्रक्रिया डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात डॉ. नितीन गायकवाड, डॉ. हरीश कोठारी, डॉ. इम्रान, डॉ. विनीत गुप्ता, डॉ. साहिल परमार यांनी केली.