बेरोजगारी, आर्थिक चणचण मोठी समस्या

मंगेश राऊत, लोकसत्ता

नागपूर : करोनाची लागण झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. पण, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या टाळेबंदीनेही अनेकांचे आप्तेष्ट हिरावले आहेत. या काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला असून उपराजधानीत टाळेबंदीच्या काळात दुपटीने आत्महत्या वाढल्याची बाब समोर आली आहे.

करोनाने जगभरात थमान घातले असून पहिल्या लाटेच्यावेळी केंद्र सरकारने देशभरात टाळेबंदी जाहीर केली होती. या टाळेबंदीमुळे अनेक कंपन्यांचे दिवाळे निघाले. कंपन्यांनी नुकसान कमी करण्यासाठी कर्मचारी कपात केली. उद्योगधंदे बुडाल्याने मजुरांचाही रोजगार गेला. याचा सर्वाधिक फटका मजूर व कामगारांना बसला. टाळेबंदी आता उठेल, नंतर उठेल या आशेत अनेकांनी पहिली लाट सोसली. पण, फेब्रुवारी २०२१ पासून महाराष्ट्रासह देशभरात करोनाची दुसरी लाट आली. मार्चपासून राज्यात टाळेबंदीला सुरुवात झाली व पुन्हा एकदा लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले. उदरनिर्वाह आणि आरोग्यावरील खर्च भागवण्यासाठी लोकांकडे पैसा नसल्याने अनेकांची दाणादाण उडाली व त्यांनी अतिशय टोकाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली.

दोन वर्षांच्या कालखंडातील टाळेबंदीतील आत्महत्येच्या घटनांचा आढावा घेतल्यास दुसऱ्या लाटेतील टाळेबंदीत आत्महत्यांच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.  जुलै, ऑगस्टमध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असून सरकारने पुन्हा टाळेबंदी केली तर समाजात करोनापेक्षा आत्महत्येमुळे लोक अधिक मरण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी स्थिती आहे. गेल्यावर्षी एप्रिल व मे महिन्यात अनुक्रमे ११ व २८ लोकांनी आत्महत्या केली होती. तर यंदा एप्रिल व मे महिन्यात अनुक्रमे ४९ व ५३ लोकांनी आत्महत्या केली.

सेवाग्राम व हुडकेश्वरच्या घटना हादरवणाऱ्या

करोनाकाळात रोजगार गेल्याने अनेकांनी टोकाचे निर्णय घेतले आहेत. याचे अनेक दाखले देता येतील. एका घटनेत सेवाग्राममधील एक तरुण बनावट बॉम्बसदृश वस्तू अंगावर बांधून मानवी बॉम्ब असल्याचे सांगत बँकेत घुसला व त्याने पैशाची मागणी केली होती. तर नुकतेच हुडकेश्वरमध्ये एकाने बिल्डरच्या कुटुंबातील सहा जणांना ओलीस ठेवून ५० लाखांची खंडणी मागितली. या घटना हादरवणाऱ्या होत्या.

दोन वर्षांतील आत्महत्यांच्या घटना

महिना  २०२०   २०२१

फेब्रुवारी ३०       ५४

मार्च    ३३       ४५

एप्रिल  ११       ४९

मे     २८          ५३

जून    ४९        २२

(१० जूनपर्यंत)