News Flash

आत्महत्येच्या प्रयत्नांचे प्रमाण तरुणांमध्ये अधिक

शेतीशी निगडित असलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या समोरील समस्यांमुळे त्यांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे

शेतीशी निगडित असलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या समोरील समस्यांमुळे त्यांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये युवकच आघाडीवर असल्याचे केवळ दोन तालुक्यांमधील अभ्यासांती आढळून आले आहे. निवडक गावांमध्ये एवढय़ा मोठय़ा संख्येने आत्महत्येचा प्रयत्न दिसून आला हे तर हिमनगाचे टोक असून, असे आत्महत्यांचे प्रयत्न गावोगावी होत असल्याचे प्रसार माध्यमांमध्ये सातत्याने दाखवले जाते.
टाटा ट्रस्टच्या अर्थसहाय्याने आणि विश्राम या संस्थेच्या आखणीतून सुमारे ४ वर्षे करण्यात आलेल्या अभ्यासात ५६ जणांनी आत्महत्या केल्या तर ७१ जणांनी आमहत्येचा प्रयत्न केला. त्यातही २१ ते ४० वयोगटातील ५१ जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून, २१ ते ३० वयोगटात २० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे तर ३१ ते ४० वयोगटात १६ पुरुष आणि तीन महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बाकी १० ते २० वयोगटात ४ पुरुषांनी आणि ५ महिलांनी, ४१ ते ५० वयोगटात सात पुरुष आणि एका महिलेने तर ५१ ते ७०च्यावर वय असलेल्यांमध्ये दोन पुरुषांनी आणि एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आढळून आला आहे.
तरुणांच्या प्रकरणांत अतिशय जीवलग व जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याने निराशा येऊन आयुष्य संपवणे, शारीरिक दुखणे किंवा एखादे गंभीर आजार, त्यामुळे होणाऱ्या अतोनात यातनांनी जीव नकोसा होणे, इतरांपासून वेगळे पडणे किंवा एकाकी जीवन असलेली व्यक्ती, स्वातंत्र्याचा संकोच, जगण्याचा काहीही हेतू नसल्याने जीव नकोसा वाटणे आणि सरतेशेवटी जीवनशैलीतील बदलांमुळेही जीवनयात्रा संपवल्याचे या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. आत्महत्येचा प्रयत्न घरीच करण्याची मानसिकता दिसून येते. एकूण ५५ व्यक्तींनी स्वत:च्या घरातच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गावात चार, शेतावर तीन आणि गावाच्या बाहेर तीन जणांनी असे प्रयत्न केले आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी ११ जणांनी कीटकनाशकाव्यतिरिक्त विषारी पदार्थाचा उपयोग केला. सहा व्यक्तींनी गळफास लावून घेतला. तर, तब्बल ४१ व्यक्तींनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तीन व्यक्तींनी विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली, प्रत्येकी एकाने विजेचा धक्का लावून घेतला आणि एकाने वाहनासमोर स्वत:ला झोकून दिले. आश्चर्य म्हणजे एकूण आठ व्यक्तींनी बलिदान केल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
विश्रामचे मध्यस्थ संचालक सिद्धार्थ गांगले म्हणाले, आत्मघातकी व्यक्ती मदतीची याचना करीत नाही. याचा अर्थ मदत नको असते असे नव्हे. शासनाकडे आत्महत्या करणाऱ्यांची आकडेवारी उपलब्ध आहे पण, तसा प्रयत्न करणाऱ्यांची नाही. आत्मघातकी व्यक्तीला आपले जीवन संपविण्याची इच्छा नसते तर त्याक्षणी होणाऱ्या वेदना व दु:ख्खापासून मुक्ती हवी असते, आत्महत्येचा प्रयत्न एकाएकी मनात येत नाही तर व्यक्तीच्या वर्तनातून त्याचा आदमास घेता येतो. मरण आणि आत्महत्येवरील साहित्याचे वाचन, झोपेच्या प्रकारात बदल, दारू पिण्यात होणारी वाढ, निष्काळजीपणे वागून स्वत:कडे दुर्लक्ष करणे, सामाजिक बाबींतून अंग काढून घेणे किंवा त्यात जास्त रस घ्यायला लागून काम पूर्ण करण्याचे मागे लागणे इत्यादी लक्षणे दिसायला लागली तर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठीची कारणे
दारूचे व्यसन – ७
कौटुंबिक भांडणे – ३२
शेतीतील नुकसान – १०
कर्ज थकबाकी – ११
मानसिक आजार – ३
एकतर्फी प्रेम – ४
इतर आजार – ३
परीक्षेच्या ताणातून – १

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 8:06 am

Web Title: suicides percentage increase in youth
टॅग : Nagpur
Next Stories
1 मुस्लीम समाजाला भीती, निराशेने ग्रासले
2 खासदार कृपाल तुमानेंकडून शासकीय कामकाजात हस्तक्षेप
3 आदिवासी मेघाची राष्ट्रीय पातळीवर गगनभरारी
Just Now!
X