महाराष्ट्राने गेल्या १५ दिवसात तीन वाघ गमावले असून या तीनही प्रकरणात शिकारीची दाट शक्यता आहे. गोंदिया वनक्षेत्रात रविवारी रात्री कुजलेल्या अवस्थेत वाघाच्या मृतदेहाचे अवयव आढळले. काही दिवसांपूर्वी ब्रम्हपुरी वनक्षेत्रात वीजप्रवाहाने वाघाचा मृत्यू झाला, तर ताडोबा येथेही गेल्या काही दिवसांपासून वाघीण गायब आहे.

गोंदिया वनपरिक्षेत्रातील मुंडीपार सहवनक्षेत्रात चुटिया बिटातील लोधीटोला शेतशिवारात रविवारी रात्री वाघ मृतावस्थेत आढळला. यावेळी अमरनाथ पटले यांच्या शेतात मृत वाघाच्या शरीराचे काही अवयव आढळले. त्यानंतर सभोवतालचा परिसर तपासला असता तिलकचंद शरणागत व योगराज नागपुरे यांच्या शेतातही वाघाच्या मृतदेहाचे काही अवयव आढळले.

वाघाचा एक पाय नखांसह, तर पुढील दोन्ही पायाची नखे, डोक्याचा भाग आणि शेपटी गायब होती. तब्बल १५ दिवसांपूर्वी या वाघाची शिकार झाली असण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, वाघाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी अवयव सीलबंद करण्यात आले आहेत. गोंदियाचे उपवनसंरक्षक कुलराज सिंग यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर वाघाची हालचाल असल्याची माहिती गोंदिया जिल्ह्याचे माजी मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर यांनी वनखात्याला दिली होती. त्यानंतरही वाघावर देखरेख ठेवण्यात यंत्रणा कमी पडली. शिकार झालेला वाघ तोच असण्याची शक्यता आहे. ब्रम्हपुरी वनक्षेत्रातही काही दिवसांपूर्वी वीजप्रवाहाने वाघाचा मृत्यू उघडकीस आला होता, तर ताडोबात वाघिणीचे तीन अनाथ बछडे मिळाले होते.

त्यातील एकाचा मृत्यू झाला तर दोन चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात आहेत. मात्र, अजूनपर्यंत या वाघिणीचा शोध लागलेला नाही. त्यामुळे या वाघिणीची शिकार झाल्याची दाट शक्यता आहे. वर्षअखेरीस अवघ्या १५ दिवसात वाघाच्या शिकारीची दाट शक्यता असणाऱ्या घटना समोर आल्याने राज्यात पुन्हा एकदा शिकार सत्र सुरू होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.