News Flash

‘स्वाईन फ्लू’ने झालेल्या मृत्यूची लपवाछपवी!

मध्य भारतातील स्वाईन फ्लूसह इतर अत्यवस्थ रुग्णांच्या उपचाराचे केंद्र म्हणून मेडिकलकडे बघितले जाते.

(संग्रहित छायाचित्र)

मेडिकलने खोटी माहिती दिली

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाकडून येथे ‘स्वाईन फ्लू’ने दगावलेल्या रुग्णांची लपवाछपवी सुरू आहे. माहितीच्या अधिकारात प्रशासनाने प्रत्यक्षात दगावलेल्या रुग्णांच्या तुलनेत कमी मृत्यू नमूद केल्याने हा प्रकार पुढे आला आहे.

मध्य भारतातील स्वाईन फ्लूसह इतर अत्यवस्थ रुग्णांच्या उपचाराचे केंद्र म्हणून मेडिकलकडे बघितले जाते. औषधांचा तुटवडा, यंत्र वारंवार बंद पडणे, काही डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे अधून-मधून हे रुग्णालय चर्चेत येते. या रुग्णालयांत २०१६ ते २०१८ या तीन वर्षांच्या काळात स्वाईन फ्लूच्या १६२ रुग्णांवर उपचार झाले. त्यातील ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. परंतु सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना मेडिकलने माहितीच्या अधिकारात दिलेल्या नोंदीत येथे २१४ स्वाईन फ्लूग्रस्तांवर उपचार झाला असून त्यातील ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दाखवले आहे.

दरम्यान, माहितीच्या अधिकारात मेडिकलमध्ये २०१६ मध्ये बाह्य़रुग्ण विभागात ७ लाख १९ हजार ११ रुग्णांवर, २०१७ मध्ये ८ लाख ५१ हजार १३५ जणांवर तर २०१८ मध्ये ९ लाख ६३ हजार ७३४ जणांवर उपचार झाले. येथे २०१६ मध्ये ६४ हजार ८३४, २०१७ मध्ये ७२ हजार २२५, २०१८ मध्ये ८५ हजार ५६९ जणांना दाखल करून उपचार करण्यात आले. त्यातील उपचारादरम्यान २०१६ मध्ये ६ ह जार १, वर्ष २०१७ मध्ये ५ हजार ५२५ तर २०१८ मध्ये ५ हजार ८१२ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूच्या नोंदीत घोळ असल्याने हे मृत्यू बरोबर नोंदवले गेले काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कर्करोगाचे १९७ मृत्यू

मेडिकलच्या कर्करोग विभागात २०१६ ते २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत ६ हजार २७३ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. पैकी उपचारादरम्यान तब्बल १९७ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक ८६ मृत्यू २०१६ मध्ये झाले असले तरी २०१७ मधील ५३ मृत्यूच्या तुलनेत २०१८ मध्ये मृत्यूसंख्या वाढून ५८ झाली आहे.

रॅबीजचे ५७ तर सर्पदंशाचे १०५ मृत्यू

श्वानासह इतर प्राण्यांनी चावा घेतल्यावर होणाऱ्या रॅबीज आजाराचे मेडिकलमध्ये तीन वर्षांत ७० रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. पैकी ५७ जणांचा मृत्यू झाला. याच काळात तर सर्पदंशाच्या ३९९ रुग्णांवर उपचार झाले. पैकी १०५ जणांचा मृत्यू झाला. श्वानाने चावा घेतलेले २१४ जणांवरही येथे उपचार झाले तर मेडिकलमध्ये डेंग्यूच्या ३०४ रुग्णांवर उपचार झाले.

माहितीच्या अधिकारात प्रशासन चुकीची माहिती देत नाही. परंतु या प्रकरणात नजरचुकीने काही चूक झाली असल्यास ती दुरुस्त केली जाईल.

– डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 2:09 am

Web Title: swine flu medical provided false information akp 94
Next Stories
1 फेसबुकवरील मित्रासाठी सुनेने चोरले घरातील २२ तोळे सोन्याचे दागिने
2 मेंदूमृत रुग्णाचे पाच जणांना अवयवदान
3 आता मेट्रोलाही निवडणूक घाई?
Just Now!
X