महापालिका आरोग्य विभागाचे निर्देश

शहरात डेंग्यूचा आजार वाढत आहे. हा आजार झाल्यास चांगले उपचार व्हावे, यासाठी अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात धाव घेतात. डेंग्यूमुळे नागरिकांच्या मनात आधीच भीती निर्माण झालेली असते. याची भीतीचा लाभ उचलत खासगी रुग्णालये रुग्णांची लूट करीत आहेत, असा आरोप करून अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले.

शहरात डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या बघता गेल्या चार दिवसांपासून शहरातील विविध भागातील झोनमध्ये आरोग्य विभागाचे सभापती मनोज चाफले यांच्या अध्यक्षतेत बैठक घेणे सुरू आहे. खासगी रुग्णालयांकडून मोठय़ा प्रमाणात डेंग्यूच्या भीतीचा प्रचार केला जात आहे. रुग्णांकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्यासाठीचा हा खासगी रुग्णालयांचा डाव आहे. साध्या तापाच्या रुग्णालाही डेंग्यूचे लक्षण असल्याचे सांगून दाखल  केले जाते. त्यानंतर महागडय़ा चाचण्या करून रुग्णांची लूट केली जाते. अशा खासगी रुग्णालयांकडून डेंग्यूबाबत महापालिकेला अहवालही सादर केला जात नाही. या खासगी रुग्णालयांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात यावे व डेंग्यूच्या नावावर नागरिकांची लूबाडणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश चापले यांनी दिले.

महापौरांकडून आंदोलनाची खिल्ली

सतरंजीपुरा झोनतंर्गत  येणाऱ्या वस्त्यांमधील डेंग्यूची साथ नियंत्रणात आणावी, या मागणीसाठी अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांच्या नेतृत्ववाखाली झालेल्या आंदोलनाची महापौर नंदा जिचकार यांनी खिल्ली उडवल्याने संतापलेल्या आंदोलकांनी महापौरांविरोधात घोषणा दिल्या. शुक्रवारी आभा पांडे यांच्या नेतृत्वात इतवारी, शांतीनगर आणि मस्कासाथ परिसरातील नागरिकांनी महापौरांच्या कक्षापुढे उपोषण सुरू केले. महापौर नंदा जिचकार आणि अतिरिक्त आयुक्त राम नामजोशी यांनी आभा पांडे यांची भेट घेतली. यावेळी महापौरांनी कोणाच्या घरी डेंग्यूचे रुग्ण आहे, अशी विचारणा आंदोलकांना केली. त्यावर आंदोलकांनी रुग्ण येथे कसे आणणार असे प्रतिउत्तर दिले. यावर समाधान न झाल्याने महापौरांनी आंदोलनाची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले.  याचा आभा पांडे यांनी निषेध केला. साथ नियंत्रणासाठी महापालिका काहीच करीत नसल्याची टीका त्यांनी केली.

नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा

परिसरातील अस्वच्छता, घरी, छपरावरील टायर, ड्रम आदींमध्ये साचणारे पाणी यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढते. हे सर्व महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या  निष्काळजीपणामुळे होते. डेंग्यूवर मात करण्यासाठी प्रत्येकाने निष्काळजीपणा सोडून स्वच्छता ही आपली जबाबदारी असल्याचे समजून कामाला लागले पाहिजे. डेंग्यूबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन जनजागृती करणारे पत्रक छापून आपापल्या प्रभागात घरोघरी वितरित करावे, अशी सूचनाही आरोग्य सभापतींनी केली.