नागपूर : करोना विषाणूने संपूर्ण देशाला विळखा घातला असून तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणून रेल्वेने गेल्या तीन दिवसांपासून नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेकगाडय़ा रद्द करण्यास सुरुवात केली आहे. आज शुक्रवारी पुन्हा नऊ गाडय़ा रद्द करण्यात आल्या. गुरुवारी दहा गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे रेल्वे वेळापत्रक कोसळले असून  दर दिवशी ७ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

नागपूरमार्गे आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, तामिळनाडू या राज्यात आणि जम्मू-काश्मीर या केंद्र शासित प्रदेशात जाणाऱ्या नऊ रेल्वेगाडय़ा पुढील पुढील दोन आठवडे रद्द करण्यात आल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. रद्द झालेल्या गाडय़ांमध्ये सिकंदराबाद – निझामुद्दीन एक्सप्रेस २२,२६ आणि २९ मार्चला रद्द करण्यात आली आहे. निझामुद्दीन-सिकंदराबाद एक्सप्रेस २३, २७ आणि ३० मार्चला धावणार नाही. तिरुपती-जम्मूतवी एक्सप्रेस २४ व ३१ मार्च रद्द तर जम्मूतवी-तिरुपती एक्सप्रेस २७ मार्च आणि ३ एप्रिलला रद्द, हैदराबाद-रक्सोल एक्सप्रेस २६ मार्च आणि रक्सोल-हैदराबाद एक्सप्रेस २२ मार्चला रद्द करण्यात आली. सिंकदराबाद-दरभंगा एक्सप्रेस २४, २८ व ३१ मार्च, दरभंगा-सिकंदराबाद एक्सप्रेस २४, २७ आणि ३१ मार्चला रद्द करण्यात आली.  जबलपूर-तिरुनेलवेली साप्ताहिक गाडी २६ मार्च, तिरुनेलवेली-जबलपूर साप्ताहिक गाडी २८ मार्च, चेन्नई- छपरा एक्सप्रेस २१, २३, २८ व ३० मार्च रद्द करण्यात आली.