निहालच्या आई-वडिलांची आर्त हाक

नागपूर : पावसात खेळू नको.. घरात ये.. असा आवाज देत आई घरकामात गुंतली. पण मुलगा आईच्या आवाजाला होकार देत येतो.. असे म्हणत मित्रांसोबत पावसात खेळायला जातो.. अचानक काही मिनिटातच तो पाय घसरून नाल्यात पडतो आणि क्षणात दिसेनासा होतो. आमचा मुलगा केव्हा परत येईल हो.. त्याला परत आणा.. असा त्याच्या आईवडिलांचा आर्त टाहो मात्र दिवसरात्र सुरूच आहे. याचे उत्तर निहालचा शोध घेणाऱ्या यंत्रणा व अग्निशमन पथकाकडे नाही. काळीज हेलावून सोडणारे हे चित्र आहे गुलमोहर नगरातील.

शहरात रविवारी मुसळधार पाऊस सुरू असताना  दहा वर्षीय निहाल मेश्राम नाल्यावरील सिमेंटच्या खांबावरून जाताना पाय घसरून पडल्याने वाहून गेला. आज दोन दिवस झाले तरी त्याचा शोध लागलेला नाही. महापालिकेचे अग्निशमन विभागाचे कर्मचारी त्याच्या शोधासाठी परिश्रम घेत आहेत. पण त्यांना यश मात्र आले नाही.  नाल्याच्या सभोवताल दाट वस्ती आहे. पलीकडे जाण्यासाठी नाल्यावरील खांबावरून जावे लागते. जीव धोक्यात घालून अनेक लोक तेथून जात असतात. निहालची आई सीमा व वडील शेखर मेश्राम यांच्याशी संवाद साधला असता त्यांचे अश्रू काही थांबलेले नव्हते.  घटनेच्या वेळी त्याची आई, १३ वर्षांचा मोठा भाऊ निखिल व पाच वर्षांची बहीण निकिता घरातच होते. अर्जुन पंडित यांच्याकडे ते टाळेबंदीच्या एक महिन्यापूर्वीच भाडय़ाने राहण्यासाठी आले.

निहालचे वडील म्हणाले, रविवारी दुपारी मुसळधार पाऊस असताना निहाल घरातच होता. मात्र पाऊस कमी झाला आणि  मित्रांसोबत तो बाहेर पडला. तेव्हा आईने त्याला पावसात खेळू नको म्हणून आवाजही दिला. त्यानेही येतो नं.. म्हणून प्रतिसाद दिला. मी कामावर होतो. निहाल नाल्यात पाण्यात पडल्याचे मित्र सांगायला आला. शेजारचे धावले. पण तोपर्यंत तो दिसेनासा झाला होता.