अनेक गरजू रुग्णांना रात्रीबेरात्री नि:शुल्क मदत

नागपूर : टाळेबंदीमुळे शहरातील अनेक ऑटोचालक बेरोजगारीशी झुंजत आहेत. रस्त्यावर प्रवासीच नसल्याने कर्जावर घेतलेले त्यांचे ऑटो घरासमोर नुसतेच उभे आहेत. बँकेचे हप्ते कसे भरायचे, ही विवंचना त्यांना त्रस्त करीत आहे. परंतु, या निराशाजनक वातावरणातही शहरातील आनंद वर्धेवार या ऑटोरिक्षा चालकाने आपल्या कल्पकतेने ऑटोलाच रुग्णवाहिकेत बदलून अडलेल्यांना  नि:शुल्क मदत करीत आहे. या उपक्रमासाठी त्याला विदर्भ ऑटोरिक्षा फेडरेशनसह इतरही काहींची मदत मिळाली.

करोनाच्या भीतीने अनेक ऑटोरिक्षा चालक  रुग्णांना रुग्णालयात न्यायला तयार नसतात. परंतु वर्धेवार गेल्या २५ दिवसांपासून या रुग्णांना रुग्णालयात पोहचवण्यासाठी मदत करीत आहेत.  खाट उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्णांना विविध रुग्णालयांच्या चकरा माराव्या लागतात. प्राणवायू वेळेत न मिळाल्याने काहींचा मृत्यूही झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन वर्धेवार यांनी विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे विलास भालेकर, जावेद शेख, अशोक न्यायखोर यांना मदत मागितली. यापैकी एकाने  प्राणवायू सिलेंडर उपलब्ध करून दिले. कुणा रुग्णाने ७३५०१७९४८४ या भ्रमणध्वनीवर मदत मागितल्यास वर्धेवार क्षणाचाही विलंब न करता रात्री-बेरात्रीही ऑटोरिक्षा घेऊन रुग्णाकडे पोहचतात. गरज असल्यास रुग्णाला प्राणवायूही लावतात. या सेवेसाठी पैसेही घेतले जात नाही. वर्धेवार यांच्या पत्नी पारडीच्या भवानी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात पॅथोलॉजी तंत्रज्ञ आहेत. त्यांनीही या कामासाठी वर्धेवार यांना रुग्णालयातून मदत मिळवून दिली. नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनीही वर्धेवार यांच्या या समाजोपयोगी कामाचे कौतुक केले.

करोनाच्या रुग्णांच्या मदतीसाठीही कुणी पुढे येत नाही. या रुग्णांना रुग्णालयात हलवताना कुठे खाट नाही, तर कुठे इतर समस्येमुळे काही  दाखला मिळत नाही. यामुळे काहींना तडफडून मरताना बघितले. त्यानंतर ऑटोरिक्षात काही दानदात्यांच्या मदतीने प्राणवायूची सोय करत रुग्णांना आता नि:शुल्क सेवा देत आहे. सध्या सिलेंडर खूप मोठे असल्यास त्रास होतो. परंतु लहान सिलेंडरसाठीही प्रयत्न करत आहे. या कामासाठी विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन व भवानी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचीही मदत मिळाली.

– आनंद वर्धेवार, ऑटोरिक्षा चालक, नागपूर.