मूर्तिकारांचा हंगाम यंदा सुनासुना, संभ्रमावस्था कायम

नागपूर : गणरायाच्या आगमनाला केवळ महिना शिल्लक  आहे. शहरातील मूर्तिकार कामाला लागले असले तरी यंदा त्यांची गती मात्र मंदावलेली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सार्वजनिक मंडळांसाठी तसेच मूर्तिकारांसाठी गणेश उत्सवासंदर्भात कोणतीच नियमावली जाहीर न केल्याने सर्वच संभ्रमात पडले आहेत. यामुळे यंदा गणेश मंडळांकडून मूर्तिकारांकडे गणेश मूर्तीची पूर्वनोंदणी करण्यात आलेली नाही. याचा फटका मूर्तिकारांना बसला आहे.

शहरातील चितारओळ ही मूर्तिकारांची भोसलेकालीन वस्ती. येथे पिढीजात मूर्तिकार असून ते आपला पारंपरिक व्यवसाय दीडशे वर्षांपासून चालवत आहेत. दरवर्षी चितारओळीमध्ये गणरायाच्या मोठय़ा मूर्ती तयार होतात. केवळ विदर्भातच नाही तर अगदी ओडिशापर्यंत येथील  मूर्तीना मागणी असते. त्यासाठी मूर्तिकारांची लगबग ही गणरायाच्या आगमनाच्या दोन महिन्यापूर्वीपासून सुरू होते. परंतु यंदा ऑगस्ट महिन्यात गणरायाचे आगमन असून केवळ महिना शिल्लक आहे. मात्र करोनामुळे लागू टाळेबंदी आणि प्रशासनाकडून मूर्तीच्या उंचीबाबत तसेच उत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर न झाल्याने मूर्तिकारांसोबत सार्वजनिक मंडळेही संभ्रमात पडली आहेत. दरवर्षी जून महिन्यात बहुतांश मूर्तिकारांकडे गणरायाच्या मूर्तीची पूर्वनोंदणी होत असते. मूर्तिकार कागदावर मूर्तीची प्रतिमा तयार क रून तिच्या विविध रंगछटा, वस्त्र, दागिने आदी प्रकार ठरवले जातात. मात्र यंदा अजूनही मूर्तीची नोंदणीच झालेली नाही. टाळेबंदीमुळे बाहेरील राज्यातील मंडळे नागपूरला येऊ शकलेली नाही. शहरातील मंडळांची पावले अजून चितारओळीकडे वळलेली नाही. मुंबईत गणरायाच्या मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आल्या आहेत.

सध्यातरी मोठय़ा गणेश मंडळांनी मूर्तीची पूर्वनोंदणी केलेली नाही. मात्र काही मूर्तिकारांनी गणरायाचे तीन फुटापर्यंतचे ढाचे तयार करून काही मूर्तीचे काम सुरू केले आहे. मूर्तिकारांची वर्षभराची उपजीविका गणेशोत्सवावर चालते. मात्र यंदा उलाढाल अर्ध्यावर येण्याची दाट शक्यता आहे.

प्रशासनाकडून नियमावलीची प्रतीक्षा

यंदा अजूनही सर्वाजनिक गणेश मंडळांकडून पूर्वनोंदणी झालेली नाही. प्रशासनाच्या नियमावलीची प्रतीक्षा आहे. मात्र उंचीची मर्यादा लक्षात घेता आम्ही छोटय़ा तीन फुटांच्या मूर्ती तयार करणे सुरू केले आहे. आमची लागत लावली आहे. यंदाची आमची उलाढाल अर्ध्यावर येईल असे चित्र दिसते. आमचा व्यवसाय टिकवायचा असेल तर पीओपीच्या मूर्त्ीना परवानगी देऊ नये. नागरिकांनी त्या खरेदी करू नये असे आवाहन आम्ही करतो.

– सचिन गायकवाड, मूर्तिकार चितारओळ.

मूर्तीच्या उंचीवर मर्यादा

अजून प्रशासनाकडून गणेश उत्सव मंडळांकडे उत्सवाबाबत कोणतीच नियमावली आलेली नाही. मात्र आम्ही ११ फुटांऐवजी ५ फुटाच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत. मिरवणूक नसणार, बँड बाजा नसणार, वर्गणीही घेणार नाही. नागरिकांनी दर्शनालाही येऊ नये, गर्दी करू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात येणार आहे. केवळ मंडळाचे पदाधिकारी आरती करू शकतील, असे छोटे मंदिर उभारू. विसर्जनही साध्या पद्धतीने करण्यात येईल.

– संजय चिंचोळे, संयोजक, संती गणेश उत्सव मंडळ.