|| राजेश्वर ठाकरे

मेट्रो रिजनचा काडीचाही लाभ नाही

नागपूर : औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाच्या राखेमुळे कामठी तालुक्यातील बिडगाव, वारेगाव, सुरादेवी गावातील पाणी, हवा दूषित झाली आहे. आरोग्य समस्यांनी ग्रासलेल्या या गावात रोजगाराचे साधन नसल्याने सुशिक्षित आणि अल्पशिक्षित बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे.

कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पातून निघणारी राख साठवत असलेल्या तलावाशेजारील वारेगाव, बिडबिना, सुरादेवी या गावात प्रदूषणाने कळस गाठला आहे. येथील लोकांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेल्या शेतीची मोठी हानी झाली आहे. जलस्रोत प्रदूषित झाल्याने घराघरात रुग्ण निर्माण झाले आहे. येथे अल्प प्रमाणात लघु उद्योग आहेत.  त्यांचीही स्थिती चांगली नाही. त्यातून पुरेसा रोजगार निर्माण होऊ शकत नाही. शिवाय मेट्रो रिजनचा परिसर असूनही येथे शासनाच्या एकही योजना अडीच वर्षांपासून पोहचल्या नाहीत. त्यामुळे शिक्षित आणि अल्पशिक्षित युवकांच्या हाताला काम नाही.

या तीनही गावात लोकसंख्येच्या ५० टक्के युवक बेरोजगार आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने या भागात भेट दिली असता गावागावातील चहाच्या दुकानांवर युवक दुपारी गप्पा करीत बसले होते. बिडबिना हा गाव राखेच्या तलावाला लागून आहे. वाऱ्यासोबत आलेल्या राखेचा थर गावातील घरांच्या छपरावर दिसून येतो. बिना नदीला लागून असलेल्यांना गावाचे वारेगाव हद्दीत पुनर्वसन झाले. परंतु सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्याऐवजी त्यांना राखेच्या ठिकाणी आणून टाकले आहे. हातमजुरी हेच अनेकांच्या उपजीविकेचे साधन  आहे. हे लोक वर्षांतील सहा महिने बेरोजार असतात. हातमजुरीचे महिलांना १५० रुपये प्रतिदिवस आणि पुरुषांना २५० रुपये मिळतात.

लोकसत्ताने या गावाला भेट दिली असता २०१४-१५ मध्ये पुनर्वसन झालेल्या गावाची अवस्था भकास कशी झाली, हे उलगडत गेले. या गावातून कोराडीच्या दिशेने निघाल्यावर काही अंतरावर सुरादेवी हे गाव येते. या गावालाही औष्णिक वीज प्रकल्पातून निर्माण झालेल्या राखेच्या भस्मासुराने ग्रासले आहे. या गावातील एकमेव तलाव राखेने आणि दूषित पाण्याने गटार झाले आहे. एकेकाळी मासेमारी, शिंगाडय़ांसाठी प्रसिद्ध असलेल्या या गोडय़ा पाण्याच्या तवालात आज मासे जिवंत राहू शकत नाही.

शिंगाडय़ाचे उत्पन्नही निम्म्यावर आले आहे. ग्रामपंचायतने गावात ‘आरओ’ लावून पिण्याची पाण्याची व्यवस्था केली आहे. नैसर्गिक पाण्याचे स्रोत दूषित झाल्याने आणि शेती पिकत नसल्याने गावाचे आर्थिक चक्र बिघडले आहे. या गावात देखील अध्र्याहून अधिक युवक बेरोजागर आहेत. या गावांचा समावेश मेट्रो रिजनमध्ये झाला आहे. परंतु गावात नागरी सुविधा मिळाल्या नाहीत. शिवाय दूषित जलस्रोत सुधारण्याची योजना नाही. अनेक गावकऱ्यांना मेट्रो रिजनमध्ये आपले गाव आहे, याचीही कल्पना नाही.

पुनर्वसित गावात अंगणवाडीही नाही

बिडबिना पुनर्वसित गावाच्या मध्ये १०० मीटर अंतराचा सिमेंट क्राँकिटचा रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झोपडीवजा घरे आहेत. येथे अंगणवाडी, प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. या ३६ कुटुंबाच्या गावातील लोकांना उपचारासाठी कामठी गाठावे लागते. येथील ७० वर्षीय सहादेव खंडाते म्हणाले, पुनवर्सन झाले, पण बेरोजागारीची समस्या आहे. गावातील कुणाकडेही शेती नाही. नियमित काम मिळाल्यास हातमजुरीतून हजार पंधराशे रुपये महिना मिळतो.

जगणे असह्य़ झालेय

महाजनकोने धरणासाठी वारेगाव येथील सुमारे ९०० एकर जागेचे संपादन केले. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेले हे धरण सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी तयार झाले. या वीजनिर्मिती प्रकल्पातून गरम पाण्यासोबत राख येते. प्रारंभी याचा त्रास नव्हता. परंतु आता धरण राखेने भरले आहे. दररोज सायंकाळी राखेचे हवेत थर दिसून येतात. एप्रिल ते जूनपर्यंत तर ही राख मोठय़ा प्रमाणात उडते. त्यावेळी घराची दारे-खिडक्या बंद ठेवाव्या लागतात. जिणे असह्य़ होते.

– एन.जी. लेकुरवाळे, वारेगाव.