नागपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने कोंढाळी आणि मेटपांजरा सर्कलमध्ये मोठय़ा प्रमाणात नाराजी असून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या पुढाकाराने सर्व नाराजांची आघाडी स्थापन करण्यात आली आहे.

ही आघाडी या दोन्ही सर्कलमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध लढणार आहे. काटोल तालुक्यातील कोंढाळी आणि मेटपांजरा सर्कलमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी यांची  आघाडी नव्हेतर माजी मंत्री अनिल देशमुख आणि माजी आमदार आशीष देशमुख या काका-पुतण्यांची आघाडी झाली आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांना विचारात घेण्यात आले नाही. त्यांच्याशी चर्चा केली नाही. विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कामे केली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. याच दोन सर्कलमधून मागच्या वेळेस अनिल देशमुख यांना मतांची टक्केवारी कमी असल्याने पराभव झाला होता. यावेळी ती मतांची उणीव भरून निघाली. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले, असा आरोप तालुका  अध्यक्ष सतीश चव्हाण यांनी केला. यामुळे दोन्ही सर्कलमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नाराजांनी आघाडी केली आहे. त्यांची आज मंगळवारी कोंढाळी येथे बैठक झाली. कोंढाळी सर्कलमधून अरुण उईके, धोतीवाडा येथून श्रीमती पुंड, मेटपंजारा येथून चंद्रशेखर चिखले, पदम डेहनकर, निशिकांत नागमोते हे अपक्ष उमेदवार आहेत.

राष्ट्रवादी सरचिटणीस फिस्के यांचा राजीनामा 

कोंढाळी, मेटपांजरा   जिल्हा परिषद सर्कलमध्ये राष्ट्रवादीत उमेदवारी वाटपावरून  असंतोष  उफाळून  आला आहे. पक्षाच्या वरिष्ठ  नेत्यांच्या  कार्यप्रलाणीवर  असंतोष  व्यक्त करीत पृथ्वीराज फिस्के यांनी राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.